संदीप आचार्य

राज्यात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनिश्चितता आणि भयाचे ढग दाटले असताना वयाची नव्वदी पार केलेल्या ९४ बाधितांनी करोनावर यशस्वी मात  केल्याने  करोनाविरोधी लढाईस बळ मिळाले आहे.

वयाची साठी ओलांडलेल्या किंवा आणि काही व्याधींचा पूर्वेतिहास असलेल्यांना या आजारापासून गंभीर धोका संभवतो, असे मानले जात असताना, या ९४ रुग्णांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर वयाच्या नव्वदीनंतरही करोनाशी सामना केल्याने आरोग्य यंत्रणेचे मनोधैर्य वाढले आहे. या वयोवृद्धांनी इस्पितळाबाहेर पहिले पाऊल टाकले, तेव्हा आरोग्यसेवकांच्या टाळ्यांतून करोनाविरोधी लढाईतील विजयाचा आनंद ओसंडून वाहात होता.

पुण्याचे ९२ वर्षांचे खरे आजोबा आज ठणठणीत आहेत. करोना झाला तेव्हा खरतर घरच्यांनी आशा सोडली होती. पण डॉक्टर मंडळी आपले उपचार प्रामाणिकपणे करत होती.  बघता बघता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. मुंबईतील ९१ वर्षांचे गजाभाऊ  असोत, की सोलापूरचे ९४ वर्षांचे  हमीदभाई असोत, सर्वाचीच  कथा थोडय़ाफार फरकाने अशीच!

करोनाच्या छाताडावर पाय देऊन त्यास परतवून लावणाऱ्या या ९४ वृद्ध योद्धय़ांमुळे या आजाराचे भय कमी होण्यास मदत झाली, असा विश्वास राज्याचे प्रधान सचिव आरोग्य डॉ. सतीश व्यास यांनी व्यक्त केला. ९० वर्षांवरील ९४ रुग्ण बरे होणे हा चमत्कार नाही, तर या वृद्धांची इच्छाशक्ती आणि आमच्या डॉक्टरांनी केलेले परिश्रम याचे हे फलित असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

१०३ वर्षांचा यशस्वी योद्धा

ठाणे : खोपट भागातील सिद्धेश्वर तलाव परिसरात राहणाऱ्या १०३ वर्षे वयाच्या सुखासिंग छाबरा यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते सोमवारी ते घरी परतले आहेत.