खलनायकी भूमिकांना वेगळ्या पद्धतीने आणि तितक्याच ताकदीने रुपेरी पडद्यावर जीवंत करणारे एक नाव, म्हणजे प्राण. त्यांनी साकारलेल्या बऱ्याच भूमिका पाहता अनेकदा मध्यवर्ती भूमिकेत असणआऱ्या अभिनेत्यावरही ते वरचढ ठरत. अशा या अभिनेत्याची कारकीर्द पाहता त्यांचे नाव मुंबईतील एका चौकाला देण्यात आले आहे.

वांद्रे येथील एका चौकाला हे नाव देण्यात आलं असून, या अनावरण सोहळ्याला अभिनेता जॅकी श्रॉफचीही उपस्थिती पाहायला मिळाली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेकडूनही यासंदर्भातील फोटो पोस्ट करण्यात आले. खुद्द जॅकी श्रॉफ यांनीही सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद व्यक्त केला.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

प्राण किशन सिकंद हे अभिनेते प्राण यांचे खरे नाव असून, यमला जट या १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. खलनायकाची व्यक्तिरेखा असली काय आणि चरित्रनायकाची व्यक्तिरेखा असली काय त्यांच्या नजरेतली आणि आवाजातली जरब कधीच बदलली नाही. त्यामुळेच असेल पण, आपल्या भूमिकांनी जो दबदबा प्राण यांनी निर्माण केला होता त्यांची जागा आजवर कोणीही भरून काढू शकलेले नाही.