14 August 2020

News Flash

‘अ’ श्रेणीतील महाविद्यालयांना परीक्षा घेण्याची स्वायत्तता ?

काही महाविद्यालयांकडे नॅकची चांगली श्रेणी असूनही त्यांना स्वायत्तता मिळू शकलेली नाही.

संग्रहित छायाचित्र)

मुंबई : परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांवरील विद्यार्थ्यांचा भार कमी व्हावा यासाठी राष्ट्रीय श्रेयांक आणि मूल्यमापन प्रणालीकडून (नॅक) अ श्रेणी मिळालेल्या शिक्षण संस्थांना परीक्षा घेण्याची स्वायत्तता देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) चाचपणी करत आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने कायम ठेवला आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये लाखोंच्या घरात असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य होणार का याबाबत प्रश्न आहेत. आयोगाने ऑनलाइन, ऑफलाइन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याचे पर्याय यापूर्वीच दिले आहेत. आता विद्यापीठांवरील परीक्षेचा भार कमी व्हावा यासाठी परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करता येईल का याचा विचार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अनेक महाविद्यालयांचे स्वायत्ततेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही महाविद्यालयांकडे नॅकची चांगली श्रेणी असूनही त्यांना स्वायत्तता मिळू शकलेली नाही. अशा महाविद्यालयांना सद्यस्थितीत परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य देण्याचा प्रस्ताव आयोगाच्या विचाराधीन आहे.

होणार काय?:  नॅककडून ‘अ’ श्रेणी मिळालेल्या म्हणजेच ३.०१ पेक्षा अधिक श्रेयांक असलेल्या महाविद्यालयांना परीक्षा घेण्याचे आणि मूल्यमापनाचे स्वातंत्र्य देण्यात येईल. महाविद्यालयातील विद्यार्थी कुठे आहेत, परीक्षा कशा घेता येतील याची चाचपणी करून महाविद्यालये त्यांच्या स्तरावर परीक्षा घेऊ शकतील. जेणेकरून या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरील भार कमी होऊ शकेल. पुणे आणि मुंबईतील काही शिक्षण संस्थांनी आयोगाकडे याबाबत मागणी केली आहे.

मागणीनुसार परीक्षेचा पर्याय

नव्या शिक्षण धोरणात मागणीनुसार परीक्षेचा पर्यायाचा समावेश आहे. सद्यस्थितीत हा पर्यायही उपलब्ध करून देण्याचे आयोगाच्या विचाराधीन आहे. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार परीक्षा देऊ शकतील. विद्यार्थी त्यांच्या परिसरातील परिस्थिती, मनस्थिती, अडचणी यांचा विचार करून कधी परीक्षा द्यायची हे ठरवू शकतील. त्यानुसार विद्यापीठे त्यांची परीक्षा घेतील. या परीक्षेतील मूल्यमापनानुसार त्यांना पदवी देण्यात येईल.

‘सद्यस्थितीत परीक्षा घेण्याची स्वायत्तता देण्याची मागणी काही शिक्षणसंस्थांनी केली आहे. त्याचा आयोगाच्या पातळीवर सकारात्मक विचार करण्यात येत आहे. परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत आयोगाचे लवचिक धोरण आहे. मी महाराष्ट्रातील आहे. तेथील परिस्थितीची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तेथे विशेष लक्ष देऊन परीक्षा घेण्याबाबत काय पर्याय योजता येतील यासाठी मी प्रयत्नशील आहे.’

डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

‘मोठय़ा संस्थांना त्यांच्या पातळीवर परीक्षा घेण्याची मुड्टाा दिली तर विद्यापीठावरील भार कमी होऊ शकेल. ऑनलाइन वर्ग, इतर उपक्रमांना सध्या विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे संस्थांच्या पातळीवर परीक्षा घेण्यात काही अडचणी येण्याची शक्यता वाटत नाही. याबाबत आयोगाकडे विचारणा केली आहे.  

-डॉ. गजानन एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 2:05 am

Web Title: a class colleges free to take exams zws 70
Next Stories
1 मुंबई पालिकेतील १०३ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
2 रेमडीसीवीर व टोसीलीझुमॅब वापरण्याची मार्गदर्शक तत्वे जाहीर!
3 करोनाचा शिरकाव झाल्यानंतर राजभवनाचं सॅनिटायझेशन
Just Now!
X