मध्य रेल्वेचा प्रस्ताव तयार; दहा फेऱ्यांचे नियोजन

मुंबई : सीएसएमटी ते कल्याण आणि ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलला बेताचाच प्रतिसाद मिळत असताना आता हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी ते पनवेल मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय घेतला असूून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मध्य रेल्वेने डिसेंबर २०२० मध्ये सीएसएमटी ते कल्याण मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू केली. दर दिवशी सीएसएमटी ते कल्याण, डोंबिवली, कुर्लादरम्यान दहा फे ऱ्या होतात. परंतु यासह पूर्वी सुरू केलेल्या गाडय़ांनाही प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असताना आता हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाने यासंदर्भातील प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वीच मुख्यालयाकडे पाठवला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर वातानुकूलित लोकल चालवताना त्याच्या दरदिवशी १० फे ऱ्या होतील, असेही सांगितले.

प्रवाशांचा प्रतिसाद कमीच

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ला पहिली वातानुकूलित लोकल धावली. या लोकलच्या दर दिवशीच्या १२ फेऱ्यांपैकी गर्दीच्या वेळेतील दोन ते तीन फेऱ्यांनाच प्रतिसाद मिळू लागला. तुलनेने तिकीट दर अधिक असल्याने या लोकल गाडीला अद्यापही अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये मध्य रेल्वेच्या ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकू लित लोकल चालवण्यात आली. या गाडीलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

‘ट्रान्स हार्बरवरील लोकल अद्याप सुरू नाही’

ट्रान्स हार्बरवरील वातानुकू लित लोकल पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. ही लोकल सेवेत येताच त्याला प्रतिसाद कमी मिळाला होता. करोनाकाळात प्रतिसाद मिळेल की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बरवरील लोकल इतक्यात सुरू करण्याचा विचार नसल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. करोनाची तीव्रता कमी झाल्यास व उपनगरीय रेल्वे सेवा रुळावर आल्यानंतरच ती सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.