सहप्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक

मुंबई : दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना दिले आहेत. तसेच दुचाकीस्वार आणि सहप्रवासी किंवा विद्यार्थ्यांने हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कंत्राटी पद्धतीने वाहतुक करणाऱ्या रिक्षांविरोधात कारवाई करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदविले आहे. २५ नोव्हेंबरपासून परिवहन विभागाकडून अनधिकृत स्कूल बस व व्हॅनवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम १० डिसेंबपर्यंत सुरू असून

न्यायालयाने नुकत्याच नोंदविलेल्या निरिक्षणानुसार मोहीमेत रिक्षा व दुचाकींवरील कारवाईचाही समावेश केला आहे. तसे आदेशच ४ डिसेंबर २०१९ ला परिवहन विभागाने काढले आहेत.

रिक्षांविरोधात  कारवाई करताना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्यास, अथवा दुचाकीचालक तसेच सहप्रवासी किंवा विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान केले नसेल तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांबरोबरच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा विद्यार्थी वाहून नेणाऱ्या दुचाकींविरोधात कारवाई केली जाणार आहे. दुचाकीचालक व सहप्रवासी किंवा विद्यार्थ्यांनेही हेल्मटे परिधान करणे गरजेचे आहे.

– शेखर चन्ने, माहिती परिवहन आयुक्त.