|| शैलजा तिवले

पदवी नसतानाही वैद्यकीय उपचार

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पनवेल येथील पॅथोलॉजीमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र निकम हे मुंबईत कुर्ला आणि मानखुर्द येथेही रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. निकम यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली असून त्यांना १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

नवीन पनवेलमधील सिद्धकला पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत वैद्यकीय पदवी नसूनही निकम हे डॉक्टर म्हणून कार्यरत होते. अधिकार नसतानाही ते रुग्णांच्या वैद्यकीय चाचणी अहवालांवर सह्य़ा करत. निकम यांचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कुर्ला येथे सुरू केलेल्या आर्यन निम्नवैद्यकीय संस्थेमध्येही एक्स रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्र, परिचारिका, शस्त्रक्रियागृहातील साहाय्यक या अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे धडेही देत होते. निकम डॉ. नीरज दुबे यांच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून उपचार करत असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.

राजेंद्र निकम आणि त्यांच्या पत्नी रेश्मा या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत.बोगस पॅथॉलॉजिस्ट म्हणून समोर आलेल्या निकम यांनी अनेक रुग्णांची फसवणूक केली असून या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी अशी मागणी पॅथॉलॉजी संघटनेने केली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी रेश्मा निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

कम्पाउंडर पदावरून थेट डॉक्टरकी..

  • चुनाभट्टीत राहणारे निकम हे १५-१६ वर्षांपूर्वी कम्पाऊंडर म्हणून एका डॉक्टरकडे काम करत होते.
  • काही कारणास्तव डॉक्टरांनी त्यांना काढून टाकल्यानंतर ते परिसरातून गायब झाले होते. त्यानंतर अचानक ते समोर आले ते डॉक्टर बनूनच.
  • कुल्र्यातील नेहरूनगर भागामध्ये आर्यन रुग्णालयात सहा ते सात वर्षांपासून ते उपचार देत आहेत.
  • मानखुर्दमध्ये शुभम रुग्णालय आणि विक्रोळी येथील डायग्नोस्टिक सेंटरमध्येही ते सेवा देत होते.