पालिकेच्या कारवाईला विरोध करणाऱ्या कॅम्पाकोलातील रहिवाशांनी आज(रविवार) मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्याशी झालेल्या भेटीनंतर अचानकपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला. कॅम्पाकोलातील रहिवाशांना कायदयाच्या चौकटीत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान दिले. कॅम्पाकोलाप्रकरणात रहिवाशांकडून सकारात्मक पाऊल उचलले गेल्यास, सरकारकडूनसुद्धा त्यांच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आता कॅम्पाकोला वसाहतीमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाई करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या दिवसातील घटनांमुळे कारवाई करणे शक्य न झाल्याने सोमवारी सकाळी पालिका पुन्हा आपल्या कारवाईला सुरूवात करण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी आज सकाळी कॅम्पाकोला येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या महानगरपालिकेच्या पथकाला रहिवाश्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. सकाळी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कॅम्पाकोलाच्या परिसरात दाखल झाले. आजच्या दिवसात अनधिकृत सदनिकांतील वीज,पाणी आणि गॅसचा पुरवठा खंडित करण्याची योजना पालिकेने आखली होती.