केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक बाबींमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून, या वस्तूंचा काळाबाजार झाल्याचे दिसून आल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी सूचना अन्न आणि औषध प्रशासनाने उत्पादकांना शनिवारी दिली.

बाजारात मास्क, सॅनिटायझरचा निर्माण झालेला तुटवडा आणि परिणामी होणाऱ्या काळाबाजारावर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने त्यांचा अत्यावश्यक बाबींमध्ये समावेश केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेश शिंगणे यांनी मुंबई, कोकण विभागातील उत्पादकांची बैठक शनिवारी घेतली. या बैठकीत सचिव डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त अरुण उन्हाळे यांच्यासह २० उत्पादक आणि प्रमुख वितरकांचे प्रतिनिधी हजर होते.

सध्या असलेला साठा, उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी याचा आढावा बैठकीत घेतला गेला. पुरवठादारांच्या अडचणी संबंधित विभागाशी संपर्क साधून सोडविण्यात येतील, असे शिंगणे यांनी सांगितले.