२७० हून अधिक ठिकाणी छापे
डाळी, तेलबिया व खाद्यतेलाचे मर्यादेपेक्षा अधिक साठे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर ‘महाराष्ट्र दहशतवादी कृत्ये प्रतिबंधक कायदा (एमपीडीए)’ किंवा ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)’ नुसार कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. राज्यभरात २७० हून अधिक ठिकाणी व्यापाऱ्यांवर छापे घालण्यात आले असून एकटय़ा पुण्यातच सुमारे १५० छापे पडले आहेत.
तूर व अन्य डाळींची खरीपाची पेरणी किती आहे, याची माहिती कृषी विभागाकडून आल्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाने पावले टाकली, असे या विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे सरकारला उशिरा जाग आल्याचे खापर आता कृषी विभागावर फोडण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीत दिलासा देण्यासाठी शिधावाटप दुकानांमधून तूरडाळ, चणाडाळ व खाद्यतेल पुरविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती बापट यांनी पत्रकारांना दिली.
mn01डाळी, कडधान्ये, कांदा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. सरकारवर चोहो बाजूने टीकास्त्र सुरू झाल्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा विभागाला जाग आली असून साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी साठय़ाचे प्रमाण जाहीर करण्यात आले. त्यानंतर या विभागाने लगेच रात्री छापेसत्र सुरू करून व्यापाऱ्यांच्या गोदामांना सील ठोकले.  केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने साठेबाजांवर कारवाई आणि साठय़ाचे प्रमाण निश्चित केले आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आणि साठय़ावरील र्निबध ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढविण्यात आले आहेत. पोलीस महासंचालकांचे आदेश मुंबई : साठेबाजांना अटक केल्यानंतर जामीन मिळू नये, यासाठी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. किती जणांवर कारवाई झाली, त्याचा तपशील दररोज देण्यासही त्यांनी सांगितले आहे.

मॉल्सवरही र्निबध : विविध मॉल्सनाही साठय़ाचे र्निबध लागू आहेत. त्यांच्याकडे धान्यसाठय़ाचा जो परवाना आहे, त्यानुसार साठय़ाची मर्यादा लागू होईल. त्यापेक्षा अधिक साठा करणाऱ्या मॉल्सवरही कारवाई केली जाईल, असे बापट यांनी सांगितले.

महसूल विभागाचे छापे
पनवेल : पनवेल तालुक्यातील सात आणि उरण तालुक्यातील एका धान्य गोदामावर महसूल विभागाने छापे टाकले आहेत. कळंबोली, डेरवली, आजिवली या गावांमध्ये ही गोदामे आहेत. ही सर्व गोदामे खासगी मालकांची आहेत. या डाळी येथे का साठविल्या याबाबत गोदामच्या मालक व व्यवस्थापनाकडे चौकशी सुरू होती.

सील केवळ नोंदीसाठी
’सील ठोकण्याच्या कारवाईला अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी मोठा विरोध केला. पण हे सील सध्या गोदामांमधील डाळींच्या नोंदीसाठी असून व्यापाऱ्यांवर लगेच गुन्हे नोंदविले जाणार नाहीत.
’सरकारने जाहीर केलेल्या साठय़ापेक्षा अधिक साठा न करता उर्वरित डाळी, तेलबिया बाजारात आणणे बंधनकारक आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढून आठवडाभरात दर उतरतील, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी व्यक्त केली.