पर्यटन, जलवाहतूक आणि व्यापाराला बळकटी आणणारे ५५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार ‘भारतीय सागरी परिषदे’च्या निमित्ताने राज्यातील बंदरांनी देशविदेशातील गुंतवणूकदारांबरोबर केले आहेत. त्याचबरोबर मीरा-भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली असा जलमार्गाचा विकास आणि ठाणे घोडबंदर परिसरात तरंगते हॉटेल (फ्लोटेल) तयार केले जाणार आहे.  या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

परिषदेत ‘महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी’ या विषयावरील सत्रात बोलताना मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी राज्यातील बंदर आणि सागरी क्षेत्रात ५५ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली. सुमारे ५७ एमओयूद्वारे ही गुंतवणूक राज्याने आकर्षित केली. राज्यात आलेल्या गुंतवणूकीतून येथील सागरी क्षेत्रात गुंतवणूकदारांना मोठी संधी दिसत आहेत, असे जलोटा यांनी सांगितले.

राज्यातील बंदरांचा विकास, बंदरांना रस्ते आणि रेल्वे मार्गाशी जोडणे, जलवाहतूक, समुद्री पर्यटन आणि मालवाहतूक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे, असेही जलोटा यांनी सांगितले. राज्यातील वॉटर टॅक्सी, क्रूझ टर्मिनल, जहाज दुरुस्ती, यॉटसाठी विशेष सुविधा (मरिना) आणि जेट्टी विकास आदीसाठी ही गुंतवणूक आली आहे. विजयदुर्ग बंदराचा विकास करण्यासाठी स्वारस्य निविदा लवकरच काढली जाणार असल्याची माहिती परिषदेत बोलताना महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. प्रवासी जलवाहतूकीसाठी मीरा भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली असा जलमार्ग विकसित केला जाणार आहे. तर राज्यात उद्योग व्यवसायाला बंदरांनी जोडण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण केली जाणार असल्याची माहिती सैनी यांनी दिली. त्याचबरोबर घोडबंदर ठाणे येथे वसई खाडीत एक तरंगते हॉटेल (फ्लॉटेल) बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे सैनी यांनी सांगितले.

महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्ड २०२१ मध्ये रो-पॅक्स आणि प्रवासी वाहतुकीसाठी जेट्टी असे सागरमाला प्रकल्पांतर्गत २० प्रकल्प पूर्ण करणार आहे.

बंदर क्षेत्राच्या विकासात सहभागी व्हावे – नरेंद्र मोदी</p>

भारत बंदर क्षेत्रात ८२ अब्ज डॉलरची गुंतवणूक २०३५ पर्यंत करणार असून या अंतर्गत सागरी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेचा वापर, सागरी मार्गांचा विकास, ‘सी प्लेन’ सेवा आणि लाइट हाऊसनजीकच्या भागात पर्यटनाला चालना देण्यात येईल. तेव्हा जगभरातील देशांनीही या विकासात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘भारतीय सागरी परिषदे’चे (मेरिटाइम इंडिया समिट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयातर्फे तीन दिवसाच्या ‘भारतीय सागरी परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे.  जगभरातील विविध देशातील प्रतिनिधी, सागरी वाहतूक क्षेत्राशी निगडित उद्योजक आणि व्यावसायिक या परिषदेत सहभागी झाले आहेत.