राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानावरील नऊ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी त्यांनी सरकार या करोना संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ती कारवाई करत असून आर्थिक चणचण असतानाही करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी निधी कमी पडू द्यायचा नाही अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे.

करोना संकट वाढू लागलं आहे. महाराष्ट्रात काही शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्र्यांसहीत इतर नेतेही सातत्याने काळीज घेण्याचं आवाहन करत आहेत, असं अजित पवार यांनी राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढल्यासंदर्भात बोलताना सांगितलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी, उद्या (शुक्रवारी) पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने मी लोकप्रितिनिधींना निमंत्रित केलेलं आहे. आम्ही सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊ, असं सांगितलं.

आणखी वाचा- ‘पुढील दोन आठवड्यात दिवसाला १००० जणांचा मृत्यू होणार’; महाराष्ट्राभोवतीचा करोनाचा फास घट्ट होण्याची भीती

करोनासंदर्भातील नियमाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे याबद्दल सर्वांचं एकमत आहे. पक्षीय राजकारण न आणता, जातीपातीचं विचार न करता सर्वांवरील संकट आहे असा विचार करुन या संकटाचा सामना करणं गरजेचं आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना करोनाची लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र त्याचवेळी त्यांनी, “४५ वर्षांच्या आतील लोकांनाही करोना व्हायला लागलाय. काही घरांमध्ये करोनाबाधितांची जास्त संख्या पहायला मिळत आहे. मला जे सरकारी निवासस्थान दिलं आहे त्या देवगिरी बंगल्यामध्येही मोठ्या संख्येने स्टाफ काम करतो. त्या स्टाफबरोबरच तिथे इतर लोकंही आहेत. मी काल सगळ्यांची तपासणी करुन घेतली तेव्हा नऊ पॉझिटिव्ह निघाले आहेत,” अशी माहितीही दिली.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगत अजित पवार यांनी, करोना ज्याला होतो तो इतरांनाही घेरतोय असं सांगितलं. आपल्याला या करोनाशी मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करतंय. या कामासाठी आर्थिक चणचण असली तरी निधी कमी पडू देणार नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे. ही पार पाडण्याचं काम करतोय, असंही पवारांनी स्पष्ट केलं.