News Flash

आता अजितदादा, तटकरे यांचे काय होणार?

जमीन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून भाजप सरकारने राष्ट्रवादीबाबत सौम्य भूमिका घेणार नाही, असा संदेश दिला असला तरी सिंचन घोटाळ्यात अजित

| June 9, 2015 03:46 am

जमीन घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून भाजप सरकारने राष्ट्रवादीबाबत सौम्य भूमिका घेणार नाही, असा संदेश दिला असला तरी सिंचन घोटाळ्यात अजित पवार वा सुनील तटकरे यांच्याविरोधात सरकार तेवढेच गांभीर्याने घेते का, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीतील वाढत्या जवळिकीमुळे राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधातील चौकशी म्हणजे फुसका बार ठरेल, अशी चर्चा होती. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी सख्य असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राष्ट्रवादीला राजकीयदृष्टय़ा अडचणीत आणण्यासाठी आग्रही आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे फडणवीस यांना भुजबळ यांच्याविरोधात कारवाई करण्याची संधी मिळाली. त्यानुसार भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बांधकाम खात्यातील घोटाळ्यापेक्षा सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. अजित पवार व सुनील तटकरे हे दोन महत्त्वाचे नेते अडकले असल्याने सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, कारण आरोपांमध्ये तथ्य नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने केला जात होता.
तेलगीत सुटले, पण बांधकामात अडकले!
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांच्यावर तेलगी घोटाळ्यात आरोप झाले. विधिमंडळात विरोधकांनी भुजबळ यांना लक्ष्य केले होते. राष्ट्रवादी तेव्हा बदनाम होऊ लागताच एका वृत्तवाहिनीवर झालेल्या हल्ल्याचे निमित्त होऊन राष्ट्रवादीने भुजबळ यांचा राजीनामा घेतला होता. तेलगी घोटाळ्यातून भुजबळ थोडक्यात बचावले असले तरी बांधकाम घोटाळ्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पक्षाची कितपत मदत?
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच छगन भुजबळ हे पक्षात नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. राज्याचे नेतृत्व करण्याची भुजबळ यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. भुजबळ थोडे डोईजड होऊ लागताच त्यांचा पत्ता कापण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. अडचणीच्या काळात पक्ष भुजबळ यांच्यामागे किती ठामपणे उभा राहतो हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तेलगी घोटाळ्यात भुजबळ यांचे नाव आल्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भुजबळ यांना पार रडवले होते. अगदी शेवटच्या क्षणी भुजबळांना मदत केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होते, की भुजबळ यांना वाऱ्यावर सोडले जाते हे थोडय़ाच दिवसांत स्पष्ट होईल. ‘‘राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणतेही चुकीचे झालेले नाही. चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. कायदेशीर लढाईत सारे निर्दोष ठरतील,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भुजबळ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्य़ासंदर्भात व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2015 3:46 am

Web Title: ajit pawar sunil tatkare irrigation scam
Next Stories
1 नवीन रस्त्यांवर लहान वाहनांना पथकरातून सूट
2 साखर कारखान्यांना अनुदान नाही
3 ‘अशोबा’ वादळाने मान्सून लांबला?
Just Now!
X