नागपूरपासून गोवा, गुजरातपर्यंत भाजपवर कुरघोडी करण्याची संधी शिवसेना सोडत नसतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादीने जरा डोळे वटारल्यावर काँग्रेसचे केंद्रीय नेते नमते घ्यायचे, पण शिवसेनेने कितीही आदळआपट केली तरी भाजपचे दिल्लीतील नेतृत्व दखलही घेत नाही. दबावाच्या राजकारणात राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा नेहमीच सरस ठरली आहे.

गोव्यात भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे रा. स्व. संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेिलगकर यांच्यापुढे शिवसेनेने मैत्रीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील खड्डय़ांवरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपची कोंडी करण्याचा सध्या एककलमी कार्यक्रम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरू केला आहे. शिवसेनेने कितीही आदळआपट केली तरीही भाजपचे नेतृत्व ढिम्म राहते. सरकार टिकविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेशी जुळवून घेतात, पण केंद्रीय पातळीवर शिवसेनेची अजिबात दखल घेतली जात नाही, असे अनुभवास येते. १८ खासदार असलेल्या शिवसेनेला अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते, तर १५ खासदार निवडून आलेल्या तेलुगू देशमला हवाई वाहतूकसारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले. केंद्र व राज्यातील सत्तेतील भागीदार भाजप आणि शिवसेनेत सध्या जुंपली असतानाच सत्ता गेलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये गेले दोन दिवस आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसमुळे आमचे नुकसान झाले किंवा आमच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी करताच, राष्ट्रवादीचा फायदा-तोटा बघणे हे आमचे कर्तव्य नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना शरद पवार यांनी जरा डोळे वटारल्यावर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून माघार घेतली जायची याची अनेक उदाहरणे आहेत. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतली असताना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पवारांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. अलीकडेच जूनमध्ये विधान परिषद निवडणुकीत राज्यातील नेत्यांचा विरोध डावलून राष्ट्रवादीला दोन जागा सोडण्यास काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी भाग पाडले होते.  शिवसेनेपेक्षा निम्मे कमी खासदार किंवा आमदारांची संख्या सारखीच असतानाही सत्तेत असताना राष्ट्रवादीची केंद्र व राज्यात दादागिरी चालायची. याउलट शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजपकडून सेनेला फारसे महत्त्व दिले जात नाही. मुंबई व ठाणे पालिकेच्या सत्तेच्या पलीकडे सेनेची उडी नाही हे भाजप नेत्यांनी पुरेपूर ओळखले आहे.

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असते आणि स्वाभिमानाशी कधीच तडजोड करीत नाही. राज्य सरकारला आम्ही पाठिंबा दिला असला तरी अन्य राज्यांमध्ये भाजपसोबत युती नाही. त्या राज्यांत स्थानिक पक्षांबरोबर युती करण्याचा पर्याय आमच्यापुढे आहे.

–  संजय राऊत,  शिवसेना खासदार

केंद्र व राज्यात सत्तेत असताना काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी आमचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. मित्र पक्ष म्हणून आम्ही मांडलेल्या प्रश्नांवर काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जायचा. केंद्रीय नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा नेहमीच सन्मान केला.

– प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते