News Flash

आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचला होता; निलेश राणेंचे बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप

हा प्रकार दोन शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना संपवण्याचे आदेशही बाळासाहेबांनी दिल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार दोन शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना संपवण्याचे आदेशही बाळासाहेबांनी दिल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.

मुलाखतीत आरोप करताना निलेश राणे म्हणाले, नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम होतं मात्र ते ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावीच लागेल.

आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचं भासवण्यात आलं. हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असे सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या होत्या मात्र, जर राणेसाहेबांवर कोणी खालच्या दर्जाचा माणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल आपण सहन करणार नाही असेही ते म्हणाले. माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली मात्र विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती पाळली नाही.

सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व सांगेन. आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 10:12 pm

Web Title: anand dighe murder was a conspiracy nilesh ranes serious allegations against balasaheb thackeray
Next Stories
1 नळदुर्गमध्ये साडेचार टन गोमांस आणि जनावरे जप्त
2 नामविस्तार दिनानिमित्त आयोजित आठवलेंच्या सभेत आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गोंधळ
3 प्रकाश आंबेडकरांनी भाजपासोबत यावे, मंत्रीपद मिळेल : आठवले
Just Now!
X