News Flash

“…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले”, अनिल देशमुखांचा माजी पोलीस आयुक्तांवर निशाणा!

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

संग्रहीत छायाचित्र

गेल्या महिन्यात अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप करणारं खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतरही हे प्रकरण अद्याप थांबलेलं नसून अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा परमबीर सिंह यांच्यावर तोफ डागली आहे. “परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती म्हणून मी त्यांची ताबडतोब बदली केली. पण त्या रागातूनच त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“…म्हणून परमबीर सिंह यांची बदली केली”

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी त्यांची बाजू मांडली आहे. “घाडगे, डांगे, सोनु जालन, केतन अशा अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी परमबीर सिंग यांच्याबद्दल येत आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर चुका केल्या. त्या माफ करण्यालायक नव्हत्या. म्हणून मी गृहमंत्री असताना परमबीरसिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केली”, असं ते म्हणाले.

“माझ्यावरच्या रागामुळेच परमबीर सिंह यांचे आरोप!”

दरम्यान, बदलीची कारवाई केल्यामुळे आपल्यावर आसलेल्या रागातूनच परमबीर सिंह यांनी आरोप केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. “मी एका कार्यक्रमात देखील यासंदर्भात सांगितलं होतं की परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांना आरोप करायचे होते तर पदावर असताना त्यांनी आरोप करायला हवे होते. गेल्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. त्यामुळेच मी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या वाझे प्रकरणाबाबतच्या एफआयआरला आव्हान दिले आहे. न्यायालयाने परमबीर यांच्या आरोपांबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र सीबीआयने वाझेंच्या पुन्हा सेवेत घेण्याचा आणि त्यांना महत्त्वाची प्रकरणे हाताळण्यास देण्याचा मुद्दा मर्यादेबाहेर जाऊन एफआयआरमध्ये समाविष्ट केला आहे. न्यायालयानेही मर्यादित तपास करायला सांगितला असतानाही सीबीआयने मर्यादेपलीकडे जाऊन तपास केल्याचा मुद्दा सरकारने याचिकेत उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 7:30 pm

Web Title: anil deshmukh slams parambir singh on ambani house bomb scare mansukh hiren murder pmw 88
टॅग : Crime News
Next Stories
1 मुंबईतील बेघर, आधार कार्ड नसलेल्यांनाही लस देणार; महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती
2 फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात
3 मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही प्राणवायूचा तुटवडा
Just Now!
X