मुंबई : मुलुंड पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत सोनवणे (५५) यांचा बुधवारी दुपारी करोना संसर्गाने मृत्यू झाला. कळवा येथील सफायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. धोकादायक वयोगटाबाबत पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार सोनवणे यांना रजेवर पाठविण्यात आले होते. ७ ऑगस्टला त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नी, दोन मुलांसह बदलापूर येथे वास्तव्यास असलेल्या सोनवणे यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास होता, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

दोन आठवडय़ांपूर्वी मुंबई पोलिसांनी प्रतिजन चाचणी सुरू केली. त्यात मुलुंड पोलीस ठाण्याचे चार अधिकारी, अंमलदार करोनाबधित असल्याचे स्पष्ट झाले. पुढल्या काही दिवसांत पोलीस ठाण्यातील सात ते आठ अधिकारी आणि तितकेच अंमलदार बाधित झाले. यापैकी काही अधिकारी, अंमलदार करोनामुक्त होऊन घरी परतले, अशी माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्कसाइट, घाटकोपर पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना सतर्क राहणे, सोवळे पाळण्याबाबत सूचना दिल्या आहेत.