उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य; निर्मला गावित आणि रश्मी बागल शिवसेनेत

मुंबई : शिवसेनेचा विस्तार होत असून निर्मला गावित आणि रश्मी बागल  यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. युतीचे काय ते आमचे ठरले आहे आणि त्यानुसार सगळे सुरू आहे. किती जागा जिंकायच्या याचा अंदाज लावत बसण्यात रस नाही तर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार जिंकायचे म्हणजे जिंकायचे, असा निर्धार शिवसेनेने केला आहे, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा करता, योग्य वेळी उत्तर देऊ, असे सूचक विधान ठाकरे यांनी केले.

काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित आणि करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप व शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यात येत असल्याने युतीचे काय असे विचारता, युतीचे काय ते आमचे ठरले आहे. त्यानुसार सगळे सुरू आहे, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले.

रश्मी बागल यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे आमदार नारायण पाटील नाराज झाले. त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेऊन त्याबाबत नाराजी नोंदवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नारायण पाटील यांची समजूत काढली आणि नाराजी नाटय़ाला पूर्णविराम मिळाला.