प्रतिजन चाचण्यांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आलेल्या २ हजार जणांपैकी २३ टक्के रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान ‘आरटीपीसीआर’ चाचणीमध्ये झाले आहे. परिणामी, प्रतिजन चाचण्यांचे नकारात्मक अहवाल सदोष असल्याचे राज्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

प्रतिजन चाचणी ‘आरटीपीसीआर’च्या तुलनेत कमी वेळात आणि कमी खर्चात होत असल्याने राज्य सरकारने  काही दिवसांपासून या चाचण्यावर भर दिला. राज्यभरात ३१ जुलैपर्यंत २ लाख ४७ हजार प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या . यातील जवळपास ८५ टक्के चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आले. प्रतिजन चाचणी नकारात्मक आलेल्या आणि लक्षणे असलेल्यांच्या पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचण्या करण्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने  स्पष्ट केले. त्यानुसार राज्यात नकारात्मक अहवाल आलेल्यांपैकी केवळ एक टक्का नागरिकांच्या पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचण्या केल्या गेल्या. यात ५५० करोनाबाधितांचे निदान झाले आहे.

१०० टक्के अचूकता नाही!

प्रतिजन ही चाचणी १०० टक्के अचूक नाही. त्यातूनही ही चाचणी अचूक पद्धतीने केली जावी याची माहिती सर्व जिल्ह्य़ांना दिलेली आहे. लक्षणे असलेल्यांच्या पुन्हा आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या लेखी सूचना दिलेल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

प्रतिजन चाचणी नकारात्मक आलेल्यांपैकी ६० ते ६५ टक्के रुग्णांच्या पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचे कस्तुरबामध्ये केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले, असे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले.