रखडलेले प्रस्ताव मागे घेण्याचा इशारा देताच सर्व प्रस्तावांना मंजुरी

स्थायी समितीकडून वारंवार नामंजुरीचे तुणतुणे वाजविण्यात येत असल्यामुळे पालिका प्रशासनाने नागरी कामांचे प्रस्ताव मागे घेण्याचे हत्यार उपसल्याने अखेर सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकली. पालिका प्रशासनाने १८ पैकी १३ प्रस्ताव मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र महापौर बंगल्यामध्ये सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेने स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सर्व प्रस्तावांना काही मिनिटांमध्ये मंजुरी दिली. ही बैठक वादळी होण्याची चिन्हे होती, मात्र प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने विरोधकही अवाक् झाले.

स्थायी समितीच्या मागील काही बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून रोखून धरण्यात आले होते. कोणत्या कारणासाठी प्रस्ताव राखून ठेवण्यात येत आहेत याचा खुलासाही बैठकांमध्ये करण्यात येत नव्हता. त्यामुळे मुंबईमधील अनेक भागांतील कचरा उचलून कचराभूमीपर्यंत वाहून नेण्याच्या कामांचा खोळंबा होऊ लागला होता. या प्रकाराचा थेट मुंबईकरांना फटका बसण्याची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता होती. सत्ताधारी शिवसेनेकडून अडवणुकीचे धोरण अवलंबिण्यात येत असल्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने नागरी कामांशी निगडित प्रस्ताव मागे घेण्याची भूमिका घेतली होती. विविध खात्यांच्या विभागप्रमुखांनी तसे पत्र पालिका चिटणीस विभागाला सादरही केले होते. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील १८ पैकी १३ प्रस्ताव प्रशासन मागे घेण्याच्या तयारीत होते. यावरून विरोधकांकडून ओरड होण्याची शक्यता होती. मात्र स्थायी समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एकेक प्रस्ताव पुकारत त्यांना मंजुरी दिली. मंजुरी नाटय़ सुरू असताना एकाही प्रस्तावावर ना सत्ताधारी नगरसेवकांनी मत व्यक्त केले ना विरोधकांनी. विनाचर्चा या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

मुंबईमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून मंडप परवानगी मिळू शकलेली नाही. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात न आल्यामुळे या मंडळांना मंडप परवानगी मिळू शकलेली नाही, असे पालिकेतील वरिष्ठ  अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यामध्ये सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने स्थायी समितीमधून प्रस्ताव मागे घेण्याबाबत सादर केलेल्या पत्रांविषयी उद्धव ठाकरे आणि अजोय मेहता यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. अखेर प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलेले सर्व प्रस्ताव स्थायी समितीमध्ये कोणतीही कुरकुर न करता मंजूर केले.