केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मॉलमधील प्रवेशासाठी ‘आरोग्य सेतू’ अॅपची सक्ती केलेली नसतानाही मुंबईतील मॉल व्यवस्थापनांनी मात्र ते बंधनकारक केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यभरात मात्र ग्राहकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
पुण्यातल्या मॉलमध्ये अॅपच्या सक्तीशिवाय प्रवेश दिला जात आहे. नाशिकमध्येही पुण्यासारखीच परिस्थिती असून औरंगाबादमध्येही अॅपची सक्ती नाही. ठाणे-नवी मुंबईत मात्र मॉल प्रवेशावरील निर्बंध अद्याप कायम आहेत. असे चित्र राज्यभर असताना मुंबईतील मॉल मात्र ‘अॅप’ बंधनकारक करीत असल्याने गोंधळाची स्थिती आहे.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात देशभर टाळेबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मॉलमधून करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वसाधारण कार्यपद्धती जारी केली. त्यानुसार ‘आरोग्य सेतू’ अॅपचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.
‘शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने केंद्र सरकारच्या नियमावलीबरोबरच मॉल आणि खरेदी संकुलांसाठी एक सर्वसाधारण कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे जूनमध्ये जारी केली. त्यात मॉल प्रवेशासाठी ‘आरोग्य सेतू’ अॅप बंधनकारक असल्याचे म्हटले होते. काही मॉलनी त्याशिवाय स्वत:च्या अॅपवर पूर्वनोंदणीची प्रक्रियाही बंधनकारक केली.
‘अॅप’चा निकष अयोग्य- श्रीहरी अणे
आरोग्य सेतू अॅपद्वारे एखादी व्यक्ती करोनाबाधित आहे हे निश्चित करता येत नाही. त्यामुळे मॉलमध्ये प्रवेशासाठी तो निकष असू शकत नाही, असे स्पष्ट करून ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे म्हणाले, ‘‘अॅप बंधनकारक करण्यामागील उद्देशही लक्षात घ्यावा लागेल. प्रवेशासाठी एक चाळणी म्हणून त्याचा वापर केला जात असेल, तर अन्य पर्यायांचा विचारही करावा लागेल.’’ प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती ओळखणे हा उद्देश असेल तर त्यासाठी अन्य पर्याय योजणे आवश्यक आहे. अर्थात, एखाद्याकडे अॅप नाही म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारणे हा मूलभूत हक्काचा भंग ठरत नाही,’ असेही अणे यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये अॅपशिवाय प्रवेश
शहरातील मॉलमध्ये प्रवेश करताना सॅनिटायझरने हातांची स्वच्छता आणि शरीराचे तापमान मोजण्याची खबरदारी घेतली जात असली तरी ग्राहकांच्या मोबाइल फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप आहे किंवा नाही, याची विचारणा केली जात नाही. मॉलचा आतील भाग, वाहनतळ परिसरात गर्दी होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. मुखपट्टी असेल तर मॉलमध्ये प्रवेश मिळतो. अंतर नियमाचे पालन करावे, याविषयी वारंवार उद्घोषणा केली जाते. गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी अधिक कॅमेरे बसवून लक्ष ठेवले जात आहे.
औरंगाबादमध्ये सक्ती नाही
शहरातील एक मॉल गुरुवारपासूनच सुरू झाला. परंतु या शहरात आरोग्य सेतू अॅपची सक्ती करण्यात आलेली नाही. प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु दोन दिवसांत फारसे ग्राहक मॉलकडे फिरकले नाहीत, असे सांगण्यात आले.
पुण्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना
मॉलमध्ये ग्राहकांना प्रवेश देताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांच्या मोबाइलमध्ये अॅप आहे की नाही, याची काटेकोर पाहणी केली जात नाही. मुखपट्टी मात्र बंधनकारक आहे. मॉलमध्ये प्रवेश करतेवेळी शरीराचे तापमान मोजले जाते आणि सॅनिटायझरचा वापर होतो.
मॉल व्यवस्थापन म्हणते.. मॉलमधील प्रवेशाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक असल्याचे, शॉपिंग सेंटर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांनी सांगितले. तर प्रतिबंधित क्षेत्रातून येणारी व्यक्ती ओळखणे हाही एक उद्देश असल्याचे काही मॉल व्यवस्थापनांनी स्पष्ट केले.
वापरामागील उद्देशच फोल
*काही छोटय़ा मॉलमध्ये केवळ तापमान मोजून आणि सॅनिटायझर वापरून प्रवेश दिला जात आहे. काही मोठय़ा मॉलमध्ये आरोग्य सेतू अॅप नसलेले काही ग्राहक प्रवेशद्वाराजवळच अॅप इन्स्टॉल करून प्रवेश मिळवतात.
* त्यामुळे अॅप वापरामागील उद्देश फोलच ठरत आहे. पावसामुळे मॉलमध्ये दोन दिवस फारशी गर्दी नव्हती.
* अॅप नसल्याने प्रवेश नाकारल्यावरून वाद उद्भवलेले नाहीत. परंतु आठवडाअखेरीस गर्दी वाढली तर असे प्रसंग घडू शकतात.