राज्य सरकारकडे यापूर्वी केलेल्या मागण्यांवर कोणताही निर्णय न झाल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या पू्र्व आणि पश्चिम उपनगरांतील रिक्षाचालकांनी १५ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या दिवशी पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये एकही रिक्षा रस्त्यावर न आणण्याचा निर्णय ऑटोरिक्षाचालक-मालक संघटनेने घेतला आहे.
१५ फेब्रुवारी रोजी वांद्रे पूर्व येथील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, त्यांच्याकडे पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. रिक्षाचालक संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीवक कठोर निर्बंध आणावेत, ओला, उबेर, टॅक्सी फॉर शुअर या सारख्या कंपन्यांच्या टॅक्सींवर बंदी आणावी, रिक्षाचालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी, रिक्षाचालक-मालकांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा दर्जा देण्यात यावा, त्यांना कमी दरात घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लायसन्स धारण करणाऱ्या रिक्षाचालकांना त्वरित बॅज देण्यात यावा, यांचा समावेश आहे.
याआधी १९ जानेवारीला या मागण्यांचे निवेदन परिवहन आयुक्तांकडे देण्यात आले होते. मात्र, त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच एक दिवस रिक्षा बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.