Covid-19 विरोधात आघाडीवर राहून लढणारे जे करोना योद्धे आहेत, डॉक्टर, नर्सेस यांच्यावर टीका करणं टाळा. त्यामुळे खच्चीकरण होतं. सल्ले, सूचना जरुर द्या पण हे तुमचं चुकलं अशा पद्धतीची टीका करु नका असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी लोकसत्ता वेबिनारच्या माध्यातून केले. डॉक्टर्स, नर्सेस सध्या करत असलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. करोनाशी त्यांची लढाई नेटाने सुरु आहे. मात्र त्यांच्यावर टीका करुन त्यांचं मनोधैर्य कमी करु नका असंही परदेशी यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या करुन रुग्ण शोधण्यात आम्हाला यश मिळालं आहे. या चाचण्या केल्याने करोना पॉझिटिव्ह रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवून फैलाव रोखता येतो असे परदेशी यांनी स्पष्ट केलं. “आधी आम्ही करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या  चाचण्या तातडीने करत होतो. पण आता आम्ही काही दिवसांच्या अंतराने चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काही वेळा रुग्णामध्ये लगेच करोनाची लक्षणे दिसत नाहीत. पॉझिटिव्ह रुग्ण सुटू नये यासाठी हा प्रयत्न आहे” असेही परदेशी यांनी सांगितलं.

एका वाचकाने मनोरंजन क्षेत्रासंबंधी प्रश्न विचारला होता. सध्या लॉकडाउन असल्याने सगळीच उद्योग क्षेत्रं बंद आहेत. त्यात मनोरंजन क्षेत्राचाही समावेश आहेच. या क्षेत्रात काम करणारे लाइटमन, स्पॉटबॉईज यांना मिळणारं वेतन हे रोजंदारी तत्त्वावर असतं. त्या दृष्टीने या क्षेत्राचं काम लवकर सुरु होईल का? यावर उत्तर देताना परदेशी म्हणाले, सगळ्या क्षेत्राप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो आहे हे अगदीच मान्य आहे. मात्र ३ मे ही लॉकडाउनची शेवटची तारीख आहे. या क्षेत्राबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही असं त्यांनी सांगितलं.