मुंबईत नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जात असून, लशींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महापालिकेनं जागतिक निविदा काढण्याचीही तयारी केली आहे आहे. अशातच वांद्रे पूर्व मतदारसंघात नवीन लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्राच्या उद्घाटनावरून काँग्रेसनं अनिल परब यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टवर कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख नसल्यानं आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.

वांद्रे पूर्वमध्ये नवीन लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याहस्ते करण्यात आलं. या उद्घाटनाला स्थानिक मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासंदर्भात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“वांद्रे पूर्व भागात शिवसेनेनं सुरू केलेल्या लसीकरण उत्सवाच स्वागत, पण इथे लसींपेक्षा जास्त पोस्टर्सच आहेत. शिवसेनेच्या वैयक्तिक पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे,” असं म्हणत झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या लसीकरण केंद्राचं उद्घाटन अनिल परब यांच्याहस्त करण्यात आलं होतं. मतदारसंघाचे आमदार या नात्याने झिशान सिद्दीकी यांना निमंत्रित करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना कोणतंही निमंत्रण दिलं गेलं नाही, त्यावरून त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. “स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का?,” असं सिद्दीकी म्हणाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.