राज्य सरकारतर्फे होत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबरोबरच उन्नत रेल्वेमार्गाद्वारे मुंबईकरांचा प्रवास आरामदायक करण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या वांद्रे-विरार उन्नत मार्गासाठी राज्यासह होणाऱ्या सहकार्य करार अंतिम टप्प्यात आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्येच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

याआधी रेल्वेने चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. पण कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो प्रकल्पाबरोबरच अन्य मेट्रो प्रकल्पांच्या जाळ्यांमुळे हा प्रकल्प धूळ खात पडला होता. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करून त्याऐवजी वांद्रे-विरार यांदरम्यान उन्नत मार्ग उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. याबाबत रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेत या प्रकल्पावर भर देण्यात आला होता.

वांद्रे-विरार उन्नत प्रकल्पामध्ये १८ नियोजित स्थानके असून त्यापैकी पाच स्थानके भूमिगत आहेत. या प्रकल्पाचा खर्च १६,३८६ कोटी एवढा प्रचंड आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम २०१७मध्ये सुरू करणार असल्याचे एमआरव्हीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जमीन संपादन करण्याच्या कामी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सहकार्य कराराची प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. हा करार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर महिन्यात मुंबईत येत आहेत. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकल्पातील नियोजित स्थानके

समांतर स्थानके :

वांद्रे, जोगेश्वरी, मिरारोड, नायगाव, विरार उत्तर

भूमिगत स्थानके :

वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली

उन्नत स्थानके :

गोरेगाव, मालाड, कांदिवली, दहिसर, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार (दक्षिण)