अमर सदाशिव शैला

बांधकाम मजुरांसाठी सुरू केलेल्या माध्यान्ह भोजन योजनच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या चार शहरातील सुमारे ४२ हजार मजुरांना दरदिवशी एकवेळच्या सकस आहाराचा पुरवठा केला जात आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून ५ रुपयांमध्ये मजुरांना भोजन उपलब्ध करून दिले जाते. मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

बांधकाम मजूरांसाठी सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर शहरातील सुमारे ४२ हजार मजूरांना बांधकामस्थळी दुपारच्या जेवण पुरवठा केला जात आहे. तर सुमारे २७ हजार मजूरांना रात्रीचे जेवण देण्यात येते. मुंबईतील १०९ बांधकाम स्थळावरील १७,५८६ मजूरांना दरदिवशी दुपारच्या जेवणाचा पुरवठा केला जातो. तर ठाण्यातील ५६ बांधकाम स्थळावरील ८,९८४, पुण्यातील १५३ बांधकाम स्थळावरील १४,२८७, नागपूरमधील २० बांधकाम स्थळावरील १,६८५ मजूरांना जेवणाचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती बांधकाम कामगार मंडळाकडून देण्यात आली. त्याचबरोबर मुंबईतील ६७ ठिकाणी १० हजार मजूरांना, ठाण्यातील ३९ ठिकाणी ६,७१६ मजूरांना, पुण्यातील ८९ बांधकामस्थळी ८,४६७ मजूरांना आणि नागपूरमधील २१ बांधकामस्थळी १७४५ मजूरांना रात्रीचे जेवण पुरविले जाते.

सद्यस्थितीत एकाच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कार्यरत असलेल्या बांधकाम प्रकल्पातील मजूरांनाच या योजनेच्या माध्यमातून अन्नाचा पुरवठा होत आहे. प्रकल्पातील बांधकाम साईट नजीकच या मजूरांनी राहण्याचे कँम्प उभारलेले असतात. पत्रा अथवा ताडपत्रीच्या साहाय्याने झोपडय़ा थाटून दाटीवाटीने हे मजूर त्यात राहतात. त्याच ठिकाणी मजूर अन्न शिजवितात. अत्यल्प उत्पन्नामुळे बऱ्यादा या मजूरांना कामाच्या प्रमाणात पोषण आहार उपलब्ध होत नाही. तसेच कामाच्या स्वरूपामुळे दुपारी अन्न शिजविणे जिकरीचे होते.

या योजनेच्या माध्यमातून मजुरांना अल्पदरात सकस आहाराचा पुरवठा करण्यात येत असून याचा फायदा त्यांना मजूरांना मिळत आहे. सध्या चार शहरातील निवडक निर्माण प्रकल्पात ही योजना राबविली जात असली तरी योजनेचा विस्तार इतर जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने मंडळाकडून विचार सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाच्या काळात ५२५ बांधकाम स्थळावरील नोंदणीकृत आणि बिगर नोंदणीकृत अशा सुमारे ८२ हजार मजुरांना या योजनेच्या माध्यमातून अन्नपुरवठा करण्यासाठी या योजनेची मदत झाली,’ अशी माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. चु. श्रीरंगम यांनी दिली.