मागण्यांचे निवेदन घेऊन भेट देणार; सोमवारपासून ७ दिवस आंदोलन

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता ‘लोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी’ असे अनोखे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक बेस्ट आगार हद्दीत येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे कर्मचारी समस्या मांडणार असून हे आंदोलन येत्या सोमवारपासून सात दिवस चालणार असल्याची माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित क अर्थसंकल्पाचे विलीनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या अ अर्थसंकल्पात तातडीने करावे, कामगार कपात करण्याची केलेली सूचना त्वरित मागे घेण्यात यावी, कंत्राटी पद्धतीने बस वाहक नेमण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, स्वत:च्या मालकीच्या बसगाडय़ा विकत घेण्यात याव्या, सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकाचे प्रदान तातडीने करण्यात यावे, विनावाहक बसगाडय़ा चालविण्याचा अयोग्य निर्णय रद्द करा इत्यादी मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केले आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनही केले जात आहे.

२७ जानेवारी २०२०ला वीर कोतवाल उद्यान ते वडाळा आगार असा लाँग मार्चही काढण्यात आला. मात्र त्यानंतरही बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. आता या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली. मुंबईत २७ आगार असून या प्रत्येक आगार हद्द व परिसरात असणाऱ्या आमदार व नगरसेवकांकडे बेस्टचे त्या आगारातील कर्मचारी जातील आणि आपल्या मागण्या सादर करतील. येत्या सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

यामुळे आमदार सुरू होणाऱ्या अधिवेशनात तरी प्रश्न मांडू शकतील, तर नगरसेवकही मुंबई पालिकेचे याकडे पुन्हा लक्ष वेधतील. त्यानंतर प्रत्येक आगारांत पुन्हा बैठका घेण्यात येतील आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मागण्यांवर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राव यांनी दिला.

बेस्टमध्ये १० हजारपेक्षा जास्त पदे रिक्त

बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीप्रमाणे दहा हजारपेक्षा जास्त पदे उपक्रमात रिक्त असल्याचे कृती समितीने सांगितले म्हणून ही पदे त्वरित भरण्याची मागणी केली आहे.