प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी आणखी एक प्रयत्न
प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या बेस्टने आता थेट प्रवाशांनाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे ‘प्रवाशांशी थेट भेट’ अभियान राबविले जात असून ५ जूनला पाच आगारातील आगार व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी आगारात उभे राहून प्रवाशांशी थेट संपर्क साधणार आहेत. यात प्रवाशांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेतली जाणार आहे. तसेच बससेवेचा स्तर उंचावण्यासाठी व प्रवासी उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रवाशांच्या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत बेस्टच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांत बेस्टची प्रवासी घटण्याचे प्रमाण प्रचंड वाढत जात आहे. याच धर्तीवर प्रवाशांची विश्वासार्हता कमावण्यासाठी अधिकारी प्रवाशांशी थेट संवाद साधणार असून बेस्ट गाडीने प्रवास करण्याचे आवाहन करणार आहेत. यात शहर विभागातील कुलाबा, बॅकबे, सेंट्रल, वरळी, वडाळा आणि वांद्रे आगारातील आगार व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता आगारात उपलब्ध राहून प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे अभियान राबवण्यात आले आहे.
मात्र प्रवाशांशी संवाद साधून प्रवासी संख्या वाढवण्यापेक्षा बस चालक आणि वाहक यांच्या मुजोरपणावर बेस्ट प्रशासनाकडून तोडगा काढल्यास प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होईल, अशा प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.
तसेच केवळ एक दिवस तेही रविवारी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधणे अशक्य असून बेस्ट केवळ अभियान राबवायचे म्हणून राबवत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. तर बेस्टकडून या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. प्रवाशांचा अधिक सहभाग असल्याशिवाय हे अभियान यशस्वी होणे अशक्य असल्याचे बेस्टकडून सांगितले जात आहे.

रेल्वेच्या मदतीला ‘बेस्ट’
पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे गाडी रुळांवरून घसरल्याने उपनगरीय प्रवाशांची गरसोय होऊ नये, यासाठी बेस्टकडून २३ जादा बस गाडय़ा चालवण्यात आल्या. या सर्व बेस्ट गाडय़ा रेल्वे मार्गाच्या लगत मार्गावरून चालवण्यात आल्या. यात बस क्रमांक २०२, २०३, २४१, ३५१, ३३, ८३, ८४ आणि १६७ या बस गाडय़ांचा समावेश होता.