रस्त्यावर धावणाऱ्या चार हजारांहून अधिक बसगाडय़ा आणि त्यातून दर दिवशी प्रवास करणारे ४० लाखांहून अधिक प्रवासी असा डामडौल सांभाळणाऱ्या बेस्ट उपक्रमासाठी २७ फेब्रुवारी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल १५ वर्षांनी बेस्टसाठी आणखी एक नवे कोरे आगार उपलब्ध होणार आहे. मालाड पश्चिम येथे नव्याने उभारलेल्या चिंचोली आगाराचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी बेस्ट समिती सदस्यांच्या उपस्थितीत होणार असून १ मार्चपासून हे आगार प्रवाशांसाठी कार्यान्वित होईल. गोरेगाव, ओशिवरा, पोयसर आणि मालवणी या चार आगारांवरील वाहतुकीचा भार या नव्या आगारामुळे कमी होणार असून या परिसरात राहणाऱ्या बेस्टच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सध्या उपक्रमाच्या ताफ्यात चार हजारांहून अधिक बसगाडय़ा आहेत. १८ मार्च १९९९ रोजी उद्घाटन झालेल्या मुलुंड आगारानंतर बेस्टकडे गेल्या १५ वर्षांत नवीन आगार उपलब्ध नव्हते. सध्या पश्चिम उपनगरांत ओशिवरा, गोरेगाव, मालवणी, मालाड, पोयसर, अंधेरी या पट्टय़ात बेस्टची वाहतूक प्रचंड वाढली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे मालवणी, पोयसर, गोरेगाव आणि ओशिवरा या चार आगारांवर प्रचंड ताण पडत होता. गोरेगाव, ओशिवरा या आगारांची गाडय़ांची क्षमता १६०-१६५ असताना प्रत्यक्षात या आगारांत २२५ गाडय़ा देखभालीसाठी येत होत्या. या आगारांवरील वाहतुकीचा हा ताण कमी करण्यासाठी नव्या चिंचोली आगाराचा उपयोग होणार आहे. या आगारातून सध्या १४ मार्ग प्रवर्तित करण्यात येणार आहेत.
चिंचोली आगाराची वैशिष्टे
*क्षेत्रफळ – १८,४४० चौ. मी.
*खर्च – ९.१० कोटी
*बसगाडय़ा क्षमता – ११५ बस
*देखभालीसाठी – ५ पिट्स
*धुलाई यंत्र
*४ पंपांचा समावेश असलेली इंधन छपरी
*इंधन टाकी भरल्यावर आपोआप बंद होणाऱ्या स्वयंचलित झडपा
*रंगकामासाठी कायमस्वरूपी मचाण
*४ प्रकाश मनोरे
*उपहारगृह, विश्रामगृह, दवाखाना आदी सुविधा