बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना आणि शशांक राव यांच्यात जुंपली असून शिवसेना प्रवक्ते आणि आमदार अनिल परब यांनी शशांक राव यांच्यावर पलटवार केला आहे. शशांक राव यांनी फक्त माथी भडकावण्याचे काम केले. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्या कुणी तरी लिहिले असावे, शशांक राव यांनी कामगारांची फसवणूक केली, अशी घणाघाती टीका अनिल परब यांनी केली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शशांक राव यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेवर गुरुवारी अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. अनिल परब म्हणाले, शिवसेनेला बदनाम करणे हा अदृश्य हाताचा हेतू होता आणि तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. नारायण राणे, कपिल पाटील, आशिष शेलार यांनी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे अदृश्य हात कोणाचे आहेत हे यावरून समोर आले, असे परब यांनी सांगितले.

शशांक राव यांची कीव वाटते की ते कुणाच्या सांगण्यावरून असे वागत होते. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे राजकारण केले गेले. शशांक राव यांचा दावा आणि हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत यात तफावत असून शशांक राव हे कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत. संप करून काही मिळत नाही. चर्चेतून मार्ग निघतो हे आता या संपावरून पालिका कर्मचाऱ्यांना समजले. त्यामुळे ते आता राव यांच्या भाषणांना बळी पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘बेस्ट’मधील कनिष्ठ कामगारांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा पण त्याच सोबत अन्य कामगारांचेही प्रश्न सुटले पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका होती. पण शशांक राव संप ताणत होते. म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला, असे परब यांनी स्पष्ट केले.