मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. विदर्भात पक्ष कमकुवत असताना पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभाव क्षेत्रातील विजयाने राष्ट्रवादीला निश्चितच फायदा होणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका सुरू झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या प्रभाव क्षेत्रातील दोन महानगरपालिकांची सत्ता गमवावी लागली. पश्चिम महाराष्ट्र या प्रभाव क्षेत्रात पक्षाची ताकद कमी झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसला. सांगली आणि सोलापूर या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ गमवावे लागले. परभणी महानगरपालिकेची सत्ता गेली. पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या विविध आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसला होता.

राष्ट्रवादीबद्दल कायम संशय आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते; पण त्यातून बाहेर पडून राष्ट्रवादीने गेल्या सहा महिन्यांपासून विरोधकांची भूमिका वठविण्यास सुरुवात केली. भाजपच्या विरोधात राज्यभर हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यास सुरुवात केली. काँग्रेसबरोबर आघाडीसाठी राष्ट्रवादीने अनुकूल भूमिका घेतली. निवडणुकीच्या तयारीसाठी राज्याच्या नेतृत्वात बदल करून जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले.

मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादीला पक्षाची बांधणी करता आली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ६२ जागा असलेल्या विदर्भात राष्ट्रवादीचा फक्त एकच आमदार निवडून आला होता. मुंबईत पाटी कोरी होती. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील विजयाने राष्ट्रवादीला निश्चितच दिलासा मिळाला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा विजय निश्चितच फायदेशीर ठरेल. गोंदिया हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला. २००९ मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला होता, पण २०१४च्या मोदी लाटेत पटेल यांचा पराभव झाला होता.

खेळी यशस्वी

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक झाल्याने ही जागा पटोले यांच्यासाठी राष्ट्रवादीने सोडावी, असा काँग्रेसचा प्रयत्न होता; पण राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिला.

कारण ही जागा काँग्रेसला सोडली आणि नाना पटोले हे विजयी झाल्यास या जागेवरील दावा पुढील निवडणुकीत सोडावा लागेल, असे राष्ट्रवादीचे गणित होते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रफुल्ल पटेल यांनी केले असल्याने त्यांनी ही जागा सोडण्यास राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टपणे नकार कळविला होता. राहुल गांधी यांनीही मग राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

जातीचे गणित राष्ट्रवादीला फायदेशीर ठरले 

भंडारा-गोंदिया या मतदारसंघात कुणबी आणि पोवार या दोन समाजांचे प्राबल्य आहे. या दोन समाजांत कायम वाद असतो. नाना पटोले यांच्या राजीनाम्याने पोटनिवडणूक झाली होती. पटोले यांनी कायम इतर मागासवर्गीयांचा मुद्दा मांडला होता. तसेच भाजपमध्ये कुणबी किंवा इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे कुणबी समाजात भाजपबद्दल नाराजी होती. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीने मधुकर कुकडे या कुणबी समाजातील नेत्याला उमेदवारी दिली. कुणबी आणि इतर मागासवर्गीय समाजाची मते राष्ट्रवादीला मिळाली. राष्ट्रवादीने प्रचारात याला प्राधान्य दिले होते. त्याचा निश्चितच फायदा राष्ट्रवादीला झाला.