पाच जागा निवडून आणण्याकरिता पुरेशी मते नसताना अतिरिक्त जागा लढविण्याची व्यूहरचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरून उठलेले वादळ व उगाचच धोका नको म्हणून भाजपने माघार घेतल्याने विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध पार पडली. अतिरिक्त एक जागा मिळावी म्हणून काँग्रेस तर बिनविरोध होण्याकरिता भाजप अशा दोन्ही डगरींवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला कसरत करावी लागली. उपसभापतीपद काँग्रेस की भाजप मिळते, याचीच आता उत्सुकता आहे.
प्रसाद लाड आणि मनोज कोटक या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने सहाव्या जागेचा जुगार खेळल्याने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले होते. योग्य नियोजन करून सहावी जागा जिंकण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची योजना होती. पण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरून उठलेल्या वादळावरून मुख्यमंत्र्यांना सावध व्हावे लागले. निवडणूक झाली आणि पक्षाचीच मते इतरत्र गेल्यास भाजपचाच एक उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता होती.

राष्ट्रवादीला मदतच
संख्याबळानुसार आघाडीचे तीन सदस्य निवडून येणे शक्य होते. राष्ट्रवादीला दोन जागा सोडण्यास काँग्रेसमधून तीव्र विरोध केला जात होता. पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडे आपले वजन वापरून राष्ट्रवादीला दुसरी जागा मिळेल, अशी व्यवस्था केली. फडणवीस हे राष्ट्रवादीला फार महत्त्व देत नाहीत. यातूनच राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या पराभवाकरिता मुख्यमंत्र्यांनी सहावी जागा लढविण्याचा निर्णय घेतला. यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. या घडामोडींचा अंदाज आल्यानेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिल्लीतील भाजपच्या उच्चपदस्थांकडे शब्द टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. काँग्रेसने एक जागा अतिरिक्त देऊन तर भाजपच्या दोन अतिरिक्त उमेदवारांनी माघार घेऊन एक प्रकारे राष्ट्रवादीला मदतच
केली.
उपसभापतीपद आता कोणत्या पक्षाला मिळते याची चर्चा सुरू झाली. आघाडीतील समझोत्यानुसार उपसभापतीपद काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली आहे. पण उपसभापतीपद देण्याच्या बदल्यात निवडणूक बिनविरोध करण्याची अट भाजपने घातली होती, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येत होते.

 

नवे सदस्य
सुरजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, आर. एन. सिंग, विनायक मेटे, सदाभाऊ खोत (भाजप), सुभाष देसाई व दिवाकर रावते (शिवसेना), नारायण राणे (काँग्रेस), रामराजे नाईक-निंबाळकर व धनंजय मुंडे (राष्ट्रवादी).

 

आघाडीचे संख्याबळ जास्त
निवडणुकीनंतर भाजपचे संख्याबळ वाढले असले तरी ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व कायम राहणार आहे.

Untitled-28