युतीसाठी साकडे, राज्यात विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र नसल्याचा संकेत

शिवसेनेसह निवडणूकपूर्व युती व्हावी ही भाजपची हार्दिक इच्छा आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केले. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसह घेण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘शत-प्रतिशत भाजप’चा मंत्र जपणाऱ्या भाजपने देशात पक्षाविरोधात तापलेले वातावरण, सर्व विरोधकांचे संभाव्य ऐक्य आणि पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी मतसंख्येत झालेली घट लक्षात घेऊन आता शिवसेनेशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर भाजपचा विराट मेळावा झाला. त्यानंतर अमित शहा यांची पत्रकार परिषद झाली. या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या विधानांद्वारे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युती करण्यास भाजप इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप मेळाव्यातील भाषणात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. भाजपला वाढवण्यात योगदान देणाऱ्या नेत्यांची नावे घेतल्यानंतर आपल्या पक्षाचे नेते नसले तरी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपच्या साथीने प्रचार केला, त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म वाढवण्यात योगदान दिले,’ असे विधान करत फडणवीस यांनी शिवसेनेशी युती करण्यास भाजप उत्सुक असल्याचे स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या पूर्ण बहुमताचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार सत्तेवर यावे म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन अमित शहा यांनी भाजपच्या मेळाव्यातील भाषणात केले. शहा यांनी भाषणात शिवसेनेचा नामोल्लेख केला नसला तरी रालोआ आणि युती सरकारच्या उल्लेखातून त्यांनी युती करण्याची भाजपची इच्छा असल्याचे म्हटले.

पत्रकार परिषदेतही अमित शहा यांनी शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी शिवसेनेशी युती करण्याची आमची हार्दिक इच्छा असल्याचे विधान केले. नंतरही एका प्रश्नाच्या उत्तरात शिवसेना सध्या तरी केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी आमच्यासह सरकारमध्ये असल्याचे नमूद केले.

भाषणातील प्राणीप्रेम!

भाजपच्या मेळाव्यातील भाषणांतील विविध प्राण्यांच्या विधानातून ‘अ‍ॅनिमल फार्म’ भरल्याचा प्रत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला गांडुळाची उपमा दिली पण खुद्द राष्ट्रवादी हीच राज्याच्या तिजोरीला लागलेली वाळवी असल्याचे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तर ज्याप्रमाणे पूर आल्यावर साप-मुंगूस, कुत्री-मांजरी हे एकाच झाडावर चढतात, त्याचप्रमाणे मोदी लाटेत आपला निभाव लागणार नाही या भीतीने सर्व विरोधक एकत्र येत असल्याचे विधान अमित शहा यांनी केले. नंतर एकमेकांशी वैर असलेले प्राणी यादृष्टीने आपण हे शब्द वापरले. पण कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास सप-बसप, कँग्रेस-तृणमूल यांसारखे एकमेकांचे राजकीय हाडवैरी असलेले आता मोदींच्या भीतीने एकत्र येत आहेत, असे आपल्याला म्हणायचे आहे, असे स्पष्टीकरण शहा यांनी केले.