देशभरात केलेल्या कामांचे सादरीकरण

पुरेशा नियोजनाअभावी गेल्या काही वर्षांत बकाल बनलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातील प्रचारादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक शहरात झालेल्या विकासकामांचे सादरीकरण करत निवडणूक प्रचाराचे एक वेगळे तंत्र यंदा अवलंबिल्याचे दिसून आले. काय करणार, यापेक्षा काय केले, या धर्तीवर केला गेलेला राज यांचा प्रचार शहरात चर्चेचा विषय ठरू लागताच सावध झालेल्या भाजप नेत्यांनी गुरुवारी दुपारी तातडीने पत्रकार परिषद घेत देशभरातील महापालिकांमध्ये सत्तेच्या माध्यमातून राबविलेल्या वेगळ्या प्रकल्पांचा पाढा वाचण्याचा प्रयत्न केला.
राज यांनी कल्याण आणि डोंबिवलीत सलग दोन दिवस प्रचार सभेत नाशिकमधील गोदापार्क, बॉटनिकल उद्यान, कुंभमेळ्याचे नियोजन, नवे रस्ते, पूल, चौक या कामांचे येथील मतदारांपुढे सादरीकरण केले. शिवसेना आणि भाजपकडून या निवडणुकीत काय करणार, याचे पाढे सातत्याने वाचले जात आहेत. असे असताना राज यांनी नाशिकमध्ये काय केले, याच्या चित्रफिती लोकांपुढे मांडल्या. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरणनिर्मितीचा पुरेपूर प्रयत्न मनसेकडून करण्यात आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
कल्याण-डोंबिवलीत अडीच वर्षांचा अपवाद वगळता साडेसतरा वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता आहे. या काळात शहराच्या दुर्दशेचे दशावतार लोकांपुढे आले आहेत. ‘शिवसेना म्हणजे विकास’ अशा स्वरूपाच्या जाहिराती शिवसेना नेते करत असले तरी या नेत्यांची प्रचारातील भाषणे भावनिक मुद्दय़ांकडे वळणारी ठरली आहेत. भाजप, पंतप्रधान, महागाई यासारख्या मुद्दय़ांवर ताशेरे ओढत शिवसेनेकडून स्मार्ट सिटीची खिल्ली उडविण्यात आली. भाजपने स्मार्ट सिटी आणि कल्याण विकास केंद्राचा मुद्दा प्रचारात लावून धरला आहे. काय करणार याचा विस्तृत आराखडा मुख्यमंत्र्यांकडून मांडण्यात येत असताना राज यांनी मात्र प्रचाराची गाडी ‘काय केले’ याकडे वळविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकमधीलरस्ते, चौक, उद्यानांच्या चित्रफिती तसेच छायाचित्रांच्या भव्य प्रमाणात केलेल्या सादरीकरणामुळे प्रचाराचे एक नवे तंत्र पुढे आले आहे.

सावध खेळी
गेल्या निवडणुकीप्रमाणे राज यांच्याकडून यंदाही धक्का बसू नये याची काळजी घेत भाजपनेही गुरुवारी दुपारी देशभरातील महापालिकांमध्ये सत्ता असताना कोणते अभिनव विकास प्रकल्प राबविले याची माहिती पत्रकारांना दिली. दरम्यान, राज यांचा धसका घेऊन हे सादरीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केला. देशभरात राबविले गेलेले अभिनव प्रकल्प तेथील मतदारांना सांगण्याचा हा प्रयत्न होता, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.