भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं सारेच विरोधात
परवाने वाटपातील गोंधळामुळे नवीन रिक्षा जाळा, असे विधान करीत कार्यकर्त्यांना चिथावणी देत हिंसेला उद्युक्त केल्याबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व रिपाइंने केली आहे.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्दय़ावर तरुणांची माथी भडकवली होती. त्यातून मुंबई, नाशिकसह काही भागांमध्ये अमराठी लोकांवर हल्ले करण्यात आले, तसेच त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. याबद्दल अनेक मराठी तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. या तरुणांना राज ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
समाजात दुही माजविणारे प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच कारवाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मुंबईतील भूमिपुत्रांना रिक्षा परवाने मिळाले पाहिजेत ही पक्षाची भूमिका असून, १५ वर्षांंपेक्षा जास्त काळ राज्यात वास्तव्य असणाऱ्यांनाही हा नियम लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुण्यातील एका उद्योगपतीच्या फायद्याकरिता ७० हजार परवाने देण्याचा घाट घालण्यात आल्याच्या राज ठाकरे यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे मतही निरुपम यांनी व्यक्त केले.
मराठी माणसाला न्याय मिळावा ही भाजपची भूमिका आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणी करीत असल्यास भाजप त्याचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी व्यक्त केली.
तसेच पक्षाचे आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा शेलार यांनी निषेध केला आहे.

राज यांचे मनसुबे उधळून लावू -आठवले
नवीन रिक्षा जाळण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला असला तरी मुंबईत असा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. याद राखा, राज ठाकरे यांचे मनसुबे रिपाइंचे कार्यकर्ते उधळून लावतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिला. भाषा आणि प्रांतवादावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

देशातही पडसाद
राज ठाकरे यांच्याविरुद्ध बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र ही कोणाच्या बापाची जागीर नाही. महाराष्ट्र, हा देश प्रत्येकासाठी आहे, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
काही पक्षांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस आणि अन्य पक्षांनी ठाकरे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एखादी व्यक्ती द्वेषमूलक वक्तव्य करते आणि ती मुक्तपणे संचार करू शकते ही बाब धक्कादायक असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अल-नासीर झकारिया यांनी म्हटले आहे.