26 September 2020

News Flash

“…हा घरी बसून चालवलेल्या कारभाराचा परिणाम”; मुंबईतील रुग्णवाढीवरून भातखळकरांची टीका

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ अधिक

गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, टाळेबंदी शिथिलीकरणाबरोबर मुखपट्टीचा वापर आणि सुरक्षित अंतराबाबत सुटलेले भान यामुळे ऑगस्टमध्ये ओसरू लागलेला करोनाचा संसर्ग मुंबईत पुन्हा वाढू लागला आहे. शहरात दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यावरून आता भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

“मुंबईतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून रुग्णवाढीचा वेग चिंताजनक झाला आहे. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम आहे,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेने दर दिवशी चाचण्यांची संख्या सुमारे १५ हजारांवर नेली. त्या तुलनेत दर दिवशीची रुग्णसंख्याही जवळपास अडीच हजारांहूनही अधिक नोंदली गेली. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

चाचण्यांची स्थिती..

मुंबईत आत्तापर्यंत ९,३६,५७४ करोना चाचण्या झाल्या असून दर दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ७२ हजार आहे. देशात सर्वाधिक चाचण्या दिल्लीत झाल्याची नोंद असून १९,०३,७६२ चाचण्या झाल्या आहेत. दर दहा लाख लोकसंख्येमागे १,००,१९८ चाचण्या केल्या जातात. या खालोखाल बंगळूरुमध्ये आत्तापर्यंत १२,३५,८८० चाचण्यांची नोंद आहे, तर दर दहा लाख लोकसंख्येमागे ९५,०६८ चाचण्या केल्या जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 11:33 am

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize mahavikas aghadi government coronavirus patient numbers increased in mumbai jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 VIDEO: वाळकेश्वरचं प्रभू रामाशी असलेलं ऐतिहासिक नातं
2 प्राणवायूच्या दरात ३० ते ४० टक्के वाढ
3 प्रवासी वाढले, फेऱ्या कमीच
Just Now!
X