मुंबईमध्ये सात ठिकाणी मलजल पम्पिंग केंद्र उभारून मलजलावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होणार आहे. मात्र पालिकेतील अकार्यक्षम सत्ताधारी शिवसेनेमुळेच हा प्रकल्प रखडल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काल(शुक्रवार)केला. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे राज्यातील सत्तेत सोबत असलेल्या मित्रपक्षाच्या नेत्याकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आल्याने काँग्रेस-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. यावरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला देखील लगावला आहे.

“जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते, त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड.” असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

मुंबईत सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या केंद्रांमध्ये मलजल प्रक्रिया करून समुद्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका होणार नाही, असा या प्रकल्पांमागील पालिकेचा उद्देश आहे.

तर, मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते.

.. टक्केवारीसाठी सर्वकाही… –

“महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण जे ३ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते ते आज १२ वर्षांनंतर देखील पूर्ण झालेले (केलेले) नाही. अपेक्षित खर्च ८५ कोटींवरून ११९ कोटी इतका वाढला (वाढवला) आहे… टक्केवारीसाठी सर्वकाही… ”असं देखील भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या नूतनीकरण खर्चात ३९ टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेवर  टीका केली आहे.