मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना भारतीय जनता पक्षाने मौन बाळगले असून कदम यांच्या दहीहंडीस उपस्थित राहून तिचे कौतुक करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य करणे टाळले आहे. एकीकडे देशभर कदम यांचा निषेध सुरू असताना ‘बेटी बचाव’चा नारा देणारा भाजप गप्प असल्याबद्दल तीव्र टीका सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘जर मुलगी लग्नाला तयार नसेल, तर मला कळवा. मी तिला पळवून आणीन,’’ असे वक्तव्य कदम यांनी मंगळवारी केल्यानंतर कालपासूनच समाजमाध्यमांत देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘मी फक्त अशा मुलीला समजवायला जाऊ, असे म्हणत होतो,’ अशी सारवासारव कदम यांनी केली असली तरी त्यातूनही मुलीला असलेला नकाराधिकार भाजपला मान्य नाही का, असा सवाल केला जात आहे. ‘‘कदम यांनी स्पष्टीकरण दिल्याने हा विषय आता संपला आहे,’’ एवढी एकच अधिकृत प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली होती. त्यानंतर पक्षाने या विषयावर चर्चा टाळल्याने पक्षाची कोंडी उघड झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आज माध्यमांना टाळण्यासाठी प्रदेश कार्यलयाकडे पाठच फिरविली. पक्षाच्या दादरमधील कार्यालयात बसून त्यांनी पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांना सूचना देऊन कोणत्याही पदाधिकाऱ्याने काहीही बोलायचे नाही असे बजावल्याचे कळते. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यालयातही मोजके पदाधिकारीही मौन व्रत पाळत होते.

‘‘कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस हे धृतराष्ट्राप्रमाणे गप्प का आहेत,’’ असा जळजलीत सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्याला आळा घालण्यात हे सरकार अपयशी ठरले असताना आता राम कदम यांच्यासारखे भाजप आमदार मुली पळविण्याची जाहीर भाषा करत असताना त्यांची तात्काळ पक्षात हकालपट्टी करण्यास मुख्यमंत्री का कचरत आहेत असा सवालही त्यांनी केला.

राज्यात महिला असुरक्षित असताना राम कदम मुली पळवण्याची भाषा करणार आणि मुख्यमंत्री फडणवीस एका शब्दानेही त्यावर बोलणार नसतील तर राम कदम यांच्याप्रमाणेच ‘पारदर्शक’मुख्यमंत्र्यांचाही तीव्र निषेध करायला हवा असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

बुधवारी दिवसभर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत राम कदम यांचे पुतळे, पोस्टर जाळण्यापासून अनेक प्रकारे जोरदार निषेध केला.  कदम यांनी बुधवारी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्यांनी माफीच मागितली पाहिजे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टीही झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp remain silence on ram kadam remarks on girls kidnapped
First published on: 06-09-2018 at 04:12 IST