सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्याचं भाजपाचं षडयंत्रही बाहेर आलं आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

काय म्हणाले आहेत सचिन सावंत?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स रुग्णालयाने जो अहवाल दिला आहे त्यावरुन हे स्पष्ट झालं आहे की त्याच्या शरीरात विषाचा कोणताही अंश नव्हता. या अहवालावरुनच हे सिद्ध झालं आहे की याप्रकरणी भाजपाने किती हीन दर्जाचं राजकारण केलं. एकंदरीतच मोदी सरकारचं देश पातळीवरचं जे अपयश आहे मग ते अर्थव्यवस्था सांभाळण्यात असेल, बेरोजगारी, करोनाची परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी हे हीन पातळीचं राजकारण करण्यात आलं. तसंच दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या मृत्यूचा फायदा घ्यावा आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करुन ते अस्थिर करण्याचंही भाजपाचं कारस्थान उघडकीस आली आहे. जनतेच्या पैशांचा उपयोग हीन राजकारणासाठी झाला असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ड्रग्ज प्रकरणी चौकशीतील प्रत्येक मिनिटाची अपडेट बाहेर कशी येते? काँग्रेस नेत्याचा सवाल

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याने बॉलिवूडमधल्या कंपूशाहीमुळे आत्महत्या केली. हिंदी सिनेसृष्टीतल्या गटबाजीमुळे त्याचा बळी गेला अशी टीका होऊ लागली. अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणी आवाज उठवला होता. दरम्यान या संदर्भातल्या बातम्याही प्रसारित होऊ लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घातलं. त्यानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली. ज्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं.