News Flash

‘क्लीन अप मार्शल’च्या बेशिस्तीला चाप

च्छ भारत अभियानाचे पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलनी तैनात राहावे,

(संग्रहित छायाचित्र)

विनाकारण नागरिकांवर कारवाई केल्यास दंड; तैनात केलेल्या ठिकाणी कचरा आढळल्यास कारवाई

प्रसाद रावकर, मुंबई

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘क्लीन अप मार्शल’च्या वर्तणुकीबद्दलच तक्रारी येऊ लागल्याने पालिकेने आता या कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली आखली आहे. या मार्शलनी अकारण कारवाई केल्याची तक्रार नागरिकांकडून आल्यास त्याची चौकशी करून संबंधित मार्शलला बडतर्फ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तैनात करण्यात आलेल्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याची वा थुंकण्याची नागरिकांची सवय मोडून काढण्यासाठी मुंबई महापालिकेने २००७मध्ये ‘क्लीन अप मार्शल’ योजना सुरू केली. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले. मात्र, कचरा टाकण्यासाठीची व्यवस्था नसताना अस्वच्छतेबाबत दंड आकारण्याच्या या योजनेला सुरुवातीपासूनच नागरिकांनी विरोध केला. त्यातच दंड वसूल करण्यावरून नागरिक आणि मार्शल यांच्यात सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले. काही ठिकाणी मार्शल विनाकारण दंड आकारत असल्याचेही उघड झाले. याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींतून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. मात्र, काही महिन्यांपासून ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पूर्वीप्रमाणेच आताही आपल्यावर विनाकारण दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी घेऊन नागरिक पालिका कार्यालयांमध्ये खेटे घालू लागले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलनी तैनात राहावे, असे पालिकेला अपेक्षित होते. मात्र काही ठिकाणी ते गायब असल्याचे निदर्शनास आले होते. अशांविरोधात कारवाईची तरतूद पालिकेने केली नव्हती. मात्र आता त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने नवे धोरण आखले आहे. क्लीन अप मार्शलच बेशिस्त झाल्यामुळे पालिकेने हे धोरण आखले असून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. क्लीन अप मार्शलचे काम करणाऱ्या सध्याच्या संस्थांची मुदत येत्या महिन्याभरात संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्या संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र या नव्या संस्थांना काळजीपूर्वक काम करावे लागेल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

क्लीनअप मार्शलची मनमानी ; भांडुपमध्ये फलक वाहून नेणाऱ्यांना दंड; रक्कम परत करण्याची नामुष्की

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पथकाशी असहकार करणाऱ्या क्लीन अप मार्शलची मनमानी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. क्लीन अप मार्शलने जाहिरातीचे फलक घेऊन जाणारा टेम्पो भांडुप-कांजूरमार्गदरम्यान अडवून चालकाला एक हजार रुपयाचा दंड ठोठावल्याने त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाय्यक आयुक्तांनी तक्रार केल्यानंतरही घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही, मात्र दंडापोटी वसूल केलेली रक्कम परत करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.

पालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत (भांडूप-कांजूरमार्ग परिसरात) प्रशासनाने ‘हंटर सिक्युरिटी फोर्स’ची नियुक्ती केली होती.

या संस्थेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला भांडुप-कांजूरमार्गदरम्यान एक टेम्पो अडवून त्याची तपासणी केली. टेम्पोमध्ये जाहिरातीचे फलक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर क्लिन अप मार्शलनी टेम्पो चालकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. फलक तयार करून देणारे मंगेश खरात यांनी पालिकेकडे तक्रार केली. चौकशीत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे आढळले.

त्यामुळे खरात यांना दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश पालिकेने संस्थेला दिले होते. या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकावे असे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाला पाठविले आहे, अशी माहिती ‘एस’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी दिली.

‘हंटर सिक्युरिटी फोर्स’ या संस्थेने वसूल केलेली दंडाची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे. त्यामुळे आपल्याला पालिकेने दंडाची रक्कम परत करावी. नागरिकांना त्रास देणाऱ्या हंटर सिक्युरिटी फोर्सचे नाव केवळ काळ्या यादीत टाकू नये, तर अन्य संस्थांना जरब बसंल, अशी कारवाई करावी.

-मंगेश खरात, तक्रारदार

मार्शलवरील कारवाईचे स्वरूप

* क्लीन अप मार्शलने विनाकारण दंडात्मक कारवाई केल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केल्यानंतर त्याची चौकशी होईल. चौकशीअंती क्लीन अप मार्शल दोषी आढळल्यास संबंधित संस्थेला १० हजार रुपये दंड आणि नागरिकाला नाहक दंड ठोठावणाऱ्या क्लिन अप मार्शलला कामावरुन काढून टाकणार.

* त्याच संस्थेच्या क्लीन अप मार्शलकडून दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा असा प्रकार घडल्यास संस्थेवर अनुक्रमे २० – ३० हजार रुपये दंडात्मक कारवाई.

* त्याच संस्थेच्या क्लीन अप मार्शलने चौथ्यांदा असा गुन्हा केला, तर संबंधित संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्याची तरतूद.

* क्लीन अप मार्शल तैनात केल्यानंतरही संबंधित ठिकाणी कचरा आढळून आल्यास त्याच्यावर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई.

क्लीन अप मार्शलबाबत अनेक तक्रारी पालिका कार्यालयात येत होत्या. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र आता नव्या संस्थांची नियुक्ती करण्यात येणार असून संस्थांच्या नियुक्तीमधील त्रुटी दूर करण्यात आली आहे. बेशिस्त वागणाऱ्या, नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या आणि परिसर अस्वच्छ असल्याचे अढळल्यास क्लीन अप मार्शल आणि त्याच्या संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतची तरतूद नव्या धोरणात आहे.

विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:46 am

Web Title: bmc make strict rules for clean up marshals
Next Stories
1 पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या वेळेत ३३ जादा लोकल फेऱ्या
2 कंदिलांवर सेल्फी, कुटुंबाची छायाचित्रे
3  ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’: अभिनेत्री मृणाल दुसानीस यांचा सहभाग
Just Now!
X