संदीप आचार्य

मुंबई: करोनाच्या लढाईत ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण हा चिंतेचा विषय असून मुंबई महापालिकेने यासाठी एक अभिनव मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील प्रत्येक विभागात ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांच्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्याचे काम केले जात आहे.यातून वेळीच ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेता येईल अशी पालिकेची भूमिका आहे.

आग लागल्यावर विहीर खणण्याऐवजी आधीच पूर्वतयारी केल्यास वेळीच आग विझवता येईल ही त्यामागची भूमिका असल्याचे मुंबईतील करोना नियंत्रण व उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी सांगितले. “सध्या साऱ्या जगात ही पद्धत अवलंबण्यात येत असून याचा अभ्यास करूनच मुंबईत आम्ही वृद्ध व जेष्ठ लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण तपासण्याचे काम सुरू केले आहे. यातही ज्यांना मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार, अस्थमा आदींचा त्रास असणाऱ्यांसाठी याचा प्रामुख्याने उपयोग होतो.”

एखादा ज्येष्ठ नागरिक ज्याला मधुमेह- रक्तदाब आदी आजार आहेत अशी व्यक्ती करोनामुळे ताप आल्यावर रुग्ण रुग्णालयात येते तेव्हा उपचार करणे एक आव्हान ठरते. अशा रुग्णांना बहुतेककरून व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते व बऱ्याच प्रकरणात त्यांचा मृत्यू होतो. करोनामुळे आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यू मध्ये ज्येष्ठांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त असून या लोकांचे ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण मोजल्यास वेळीच त्यांची काळजी घेऊन त्यांना होणारा त्रास टाळता येणे शक्य आहे.

शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असल्यास अशांना रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजन दिल्यास तसेच अन्य औषधोपचार केल्यास त्यांची प्रकृती निश्चित चांगली राहू शकते हे डॉ ओक यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्त प्रवीण परदेशी व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी तात्काळ या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही योजना अजिबात खार्चिक नाही. एक छोटेसे मशिन बोटाच्या टोकाला लावून शरीरातील प्राणवायूच्या प्रमाणाचे निश्चितीकरण करते. हे प्रमाण ९५ पेक्षा कमी असल्यास अशा लोकांना तात्काळ ऑक्सिजन देणे गरजेचे आहे.

“गेल्या तीन दिवसांपासून पालिकेने ही मोहीम मुंबईतील २४ विभागात राबविण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मुंबईतील ४५,७५१ घरांमधील १,७६,३५१ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ५४२८ ज्येष्ठ नागरिकांची पल्स ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले असून यात १५२ वृद्ध लोकांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असल्याचे आढळून येताच त्यांना तात्काळ पालिका रुग्णालयात ऑक्सिजन थेरपी देण्यात आहे” असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यापुढचा टप्पा म्हणजे अशा सर्व वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह, रक्तदाब, ईसीजी व टुडी इको करण्यात येणार असल्याचे डॉ संजय ओक यांनी सांगितले. ज्येष्ठ व वयोवृद्ध लोकांच्या वेळीच अशा चाचण्या झाल्यास त्यांना असलेल्या त्रासावर वेळीच उपचार करून पुढील संभाव्य धोका टाळता येईल, असेही डॉ ओक यांनी सांगितले.