वाहनतळासाठी विशेष परवानगी

हजारीमल सोमाणी मार्गाच्या विस्तारिकरणात सहकार्य करण्यास तयार नसलेल्या बॉम्बे जिमखान्याला पालिकेने विशेष परवानगी देत वाहनतळ बहाल केले आहे. केवळ जिमखान्याच्या सभासदांची वाहने उभी करण्यासाठी पालिकेने या विशेष वाहनतळाला परवानगी दिली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना या वाहनतळावर आपले वाहन उभे करता येणार नाही. प्रशासनाने बॉम्बे जिमखान्यासमोर नांगी टाकून या वाहनतळासाठी विशेष परवानगी दिल्याची चर्चा पालिकेमध्ये सुरू झाली आहे.

काही वर्षांपूर्वी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने बॉम्बे जिमखान्यालगतच्या महात्मा गांधी मार्गावरील पदपथाचा वापर वाहनतळासाठी करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे बॉम्बे जिमखान्याचे सभासद या पदपथावर आपल्या आलिशान गाडय़ा उभ्या करीत होते. मात्र सर्वसामांन्यांना या वाहनतळावर गाडी उभी करण्यास जिमखान्याच्या सुरक्षा रक्षकाकडून मनाई करण्यात येत होती. अनेक वेळा सर्वसामान्य वाहनचालक आणि बॉम्बे जिमखान्याच्या सुरक्षा रक्षकांचे खटके उडाल्याच्या घडनाही घडल्या होत्या. पालिका आणि बॉम्बे जिमखान्यामध्ये या वाहनतळाबाबत झालेल्या कराराची मुदत गेल्या वर्षी संपुष्टात आली होती. त्यामुळे वाहनतळासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बॉम्बे जिमखान्याकडून पालिकेला करण्यात आली होती. मात्र भविष्यात पदपथावर वाहनतळाला परवानगी द्यायची नाही, असा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. परिणामी, बॉम्बे जिमखान्याच्या अर्जावर कोणताच विचार झाला नव्हता.

वाहनतळासाठी परवानगी मिळावी यासाठी बॉम्बे जिमखान्याकडून वारंवार पालिकेला विनंती करण्यात येत होती. अखेर पालिकेने बॉम्बे जिमखान्याला ३१ ऑक्टोबर २०१७ पासून सहा महिन्यांसाठी महात्मा गांधी मार्गाचा वाहनतळासाठी वापर करण्यास परवानगी दिली. वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी बॉम्बे जिमखान्याने २३ लाख ३२ हजार ८०० रुपये शुल्क पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. सुरक्षा ठेव म्हणून २ लाख ३३ हजार २८० रुपये, वस्तू आणि सेवा करापोटी ४ लाख १९ हजार ९०५ रुपये आणि अन्य शुल्कापोटी ४६ हजार ६५६ रुपये भरण्याची सूचना पालिकेने बॉम्बे जिमखान्याला केली होती. ही सर्व रक्कम बॉम्बे जिमखान्याने पालिकेच्या तिजोरीत जमा केली असून पालिकेकडून विशेष परवानगी मिळताच बॉम्बे जिमखान्यालगत महात्मा गांधी मार्गाचा वाहनतळासाठी वापर होऊ लागला आहे. मात्र या वाहनतळावर काही वेळा दुहेरी रांगेत वाहने उभी   करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. परंतु त्याकडे वाहतूक पोलीस लक्ष देण्यास तयार नाहीत. महात्मा गांधी मार्गावरुन थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणात बॉम्बे जिमखान्याचा काही भाग जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी हजारीमल सोमाणी मार्गावरुन नागरिक मोठय़ा संख्येने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जात-येत असतात. तसेच नरिमन पॉइंट, कुलाबा परिसरातील वाहने दक्षिण मुंबईमधून बाहेर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करीत असतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या मर्गावर पादचारी आणि वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणास बॉम्बे जिमखान्याकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पालिका हैराण झाली आहे. त्यामुळे हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे. असे असताना आता पालिका प्रशासनाने बॉम्बे जिमखान्यासमोर नांगी टाकून सभासदांची वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाला विशेष परवानगी दिली आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.