सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर या प्रकरणी अनेक नवी माहिती समोर आली. दरम्यान, ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयानं माध्यमांना संयम ठेवण्यास सांगितलं.

आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसंच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावं, असं न्यायालयानं सुनावणीदरम्यान सांगितलं.

राज्यातील माजी डीजीपी एम.एन.सिंग, पी.एस. पसरिचा, डी.के.सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के.सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के.पी.रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसंच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखं बदलू नये,” असं याचिकाकर्त्यांनी नमूद केलं होतं.