कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आता २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांना २२ तारखेपर्यंत अंशत: दिलासा मिळाला आहे.

आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केलीच तर १ लाख रुपयांचा जातमुचलका व त्यापेक्षा अधिक रकमेच्या हमीवर त्यांची सुटका करण्यात यावी, असे उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले. तेलतुंबडे यांनी पुणे पोलिसांसमोर १४ आणि १८ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

एक फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषद प्रकरणी तेलतुंबडे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.