News Flash

मुंबई विद्यापीठाचे दात घशात!

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठ किती असंवेदनशीलपणे हाताळू शकतो हेही दिसून येते.

मुंबई विद्यापीठ ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुनर्मूल्यांकनानंतर बीएस्सी आयटीचे १० विद्यार्थी उत्तीर्ण

बीएस्सी-आयटीच्या १५० विद्यार्थ्यांचा एकही गुण वाढणार नाही, उलट गुण झाले तर कमीच होतील, असा निर्वाळा देत महिनाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आपला सदोष निकाल सुधारण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना वाटेला लावले होते. मात्र अवघ्या महिभरातच परीक्षा विभागाला याच विद्यार्थ्यांपैकी सुमारे १० ते १२ विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मूल्यांकन व्यवस्थेतील सदोषपणावर शिक्कामोर्तब तर झालेच आहे, शिवाय १५८ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या या संस्थेला आपल्याच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत किती असंवेदनशील आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’च्या (आयडॉल) माध्यमातून पाचव्या सत्राची परीक्षा दिलेले तृतीय वर्ष विज्ञान शाखेचे (माहिती तंत्रज्ञान-आयटी) सुमारे १५० विद्यार्थी गेले दोन महिने या असंवेदनशील वृत्तीचा अनुभव घेत आहेत. ही परीक्षा दिलेल्या १५४पैकी अवघे आठ विद्यार्थीच १५ फेब्रुवारीला लागलेल्या निकालात उत्तीर्ण झाले होते. यातील नियमित (फ्रेशर्स) ८६ विद्यार्थ्यांपैकी तर अवघी एक विद्यार्थिनीच परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे हा निकाल सदोष असल्याचा संशय व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुन्हा मूल्यांकन व्हावे अशी मागणी कुलगुरूंनी केली होती. ही मागणी मान्य तर झाली नाहीच, परंतु, पाठपुरावा केलेल्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिल रोजी परीक्षा विभागाने पत्र देऊन एकाही विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ होणार नाही, उलट झाले तर गुण कमीच होऊन मार्गी लावले होते. मात्र या विद्यार्थ्यांपैकी काहींनी फोटोकॉपी आणि पुनर्मुल्यांकनाकरिता अर्ज केले होते. त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात दोन नियमित विद्यार्थिनी आधीच्या गुणांपेक्षा दुप्पट गुण मिळवून एकूण तीन विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांपैकी एकूण उत्तीर्णाची संख्या तीन झाली आहे. या शिवाय एटीकेटीच्या विद्यार्थ्यांंपैकीही सात-आठ जण उत्तीर्ण झाल्याने परीक्षा विभागाच्या ३ एप्रिल रोजी दिल्या गेलेल्या लेखी निर्वाळ्यातील फोलपणा व खोटारडेपणा उघड झाला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठ किती असंवेदनशीलपणे हाताळू शकतो हेही दिसून येते.

हे विद्यार्थी गेले दोन महिने आपल्या सदोष निकालाची विद्यापीठाने दखल घ्यावी याकरिता कुलगुरूंच्या कार्यालयापासून ते परीक्षा विभागापर्यंत खेपा मारत आहेत. पण, तिथे दाद न लागल्याने त्यांना नाईलाजाने राजकीय नेत्यांची व प्रसारमाध्यमांची मदत घ्यावी लागली. पण त्यावरूनही विद्यापीठाचे उच्चपदस्थाच्या टोमण्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यापीठाकडून दिलासा न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना आता नाईलाजाने फेरपरीक्षा द्यावी लागली आहे.

विद्यापीठाचा आधीचा निकाल खरा मानायचा की त्यांनी आम्हाला दिलेले पत्र. आता पुनर्मुल्यांकनाचा निकालात वेगळेच सत्य समोर येत आहे. हा काय प्रकार आहे. वर्षभर अभ्यास करून आम्ही जे उत्तरपत्रिकेत लिहिले त्याचे किमान मूल्यांकन तरी झाले आहे का, असा उद्विग्न सवाल एका विद्यार्थ्यांने लोकसत्ताशी बोलताना केला.

या प्रकाराबाबत परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. एकाही विद्यार्थ्यांच्या गुणात बदल होत नाही आहे, असा निर्वाळा विषयाच्या प्रमुखांनी दिला होता. त्यात मी काहीच बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:51 am

Web Title: bsc it ten student pass in rechecking
Next Stories
1 पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची कामे?
2 सुरतचा उपाहारगृह चालक ते ठाण्याचा ‘गँगस्टर’
3 मुंबई आणि नवी मुंबई खाडीलगत ‘रशियन पाहुणा’
Just Now!
X