28 May 2020

News Flash

अतिरिक्त एफएसआय विकून पुनर्विकास शक्य!

महापालिका तसेच राज्य शासनाचेही दार ठोठावले. परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही.

 

‘एअरपोर्ट रनवे फनेल’अंतर्गत येणाऱ्या उपनगरातील ४०० इमारतींच्या विकासाबाबत रहिवाशांचा पालिकेला प्रस्ताव

एअरपोर्ट रनवे फनेलचा फटका – उत्तरार्ध

खुल्या विक्रीसाठी चटईक्षेत्रफळ उपलब्ध नसल्यामुळे ‘एअरपोर्ट रनवे फनेल’अंतर्गत येणाऱ्या उपनगरातील ४०० इमारतींचा खासगी विकासकामार्फत पुनर्विकास होऊ शकत नाही. ठप्प झालेला पुनर्विकास मार्गी लागण्यासाठी अतिरिक्त चटईक्षेत्रफळ विकण्याची मुभा द्यावी, अशी या रहिवाशांची मागणी आहे. तसे झाल्यास त्यातून मिळणाऱ्या रकमेतून आमच्या इमारतींचा पुनर्विकास होऊ शकेल, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. तसा प्रस्ताव त्यांनी पालिकेला सादर केला आहे.

उपनगरात खासगी इमारतींसाठी एक इतके चटईक्षेत्रफळ आणि एक विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) असे दोन इतके चटईक्षेत्रफळ आणि त्यावर फंजीबल स्वरुपात पॉइंट सात अशा रीतीने २.७ इतके चटईक्षेत्रफळ लागू आहे. जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी इतके चटईक्षेत्रफळ पुरेसे असते. जुन्या रहिवाशांना किमान ४० टक्के अतिरिक्त जागा दिल्यानंतर उरलेले चटईक्षेत्रफळ विकासकाला खुल्या बाजारात विक्रीसाठी मिळते. पार्ले, सांताक्रूझ या सारख्या परिसरातील सध्याचे जागांचे भाव पाहता भरमसाठ फायदा मिळत असल्यामुळे विकासकही खुशीने पुढे येतात. परंतु ‘फनेल’मधील इमारतींना फक्त एक इतकेच चटईक्षेत्रफळ अनुज्ञेय असल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी कोणीही विकासक पुढे येत नाही. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास गेल्या काही वर्षांपासून ठप्प झाला आहे.

याबाबत रहिवाशांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. महापालिका तसेच राज्य शासनाचेही दार ठोठावले. परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडून मरण पत्करण्याशिवाय आम्हाला काहीही पर्याय नाही, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. आमच्या परिसरात राहणाऱ्या वास्तुरचनाकारांनी नियमांचा अभ्यास करून पर्याय सुचविले आहेत. त्याचा विचार व्हावा, अशीच आमची माफक अपेक्षा आहे. अनेक वयोवृद्ध नागरिकांना मासिक खर्च चालविताना नाकीनऊ येत असताना स्वखर्चाने इमारतीचा पुनर्विकास करणे शक्यच नाही. इतकेच नव्हे तर एक इतके चटईक्षेत्रफळ वापरण्याइतपतही जागा नाही, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले.

पुनर्विकासासाठी विकासक पुढे आल्यास वाढीव जागा, भाडे, कॉर्पस निधी मिळतो. याशिवाय इमारतीची पुनर्बाधणी, विविध परवाने आदींची मोठा खर्चही विकासक करतो. परंतु आमच्याबाबत ते शक्य नसल्यामुळे आम्हाला जे इतरांप्रमाणे चटईक्षेत्रफळ लागू आहे त्यापैकी पुनर्विकासासाठी लागणारे चटईक्षेत्रफळ वजा जाता उर्वरित चटईक्षेत्रफळ विकण्याची आम्हाला परवानगी देण्यात यावी. या पैशातून आम्ही आमचा पुनर्विकास प्रकल्प राबवू शकतो तसेच पालिकेलाही विविध परवाने आणि करांपोटी मोठी रक्कम देऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नव्याने येऊ घातलेल्या विकास आराखडय़ात ‘एअरपोर्ट रनवे फनेल’ बाधित असा दर्जा देण्यात यावा आणि या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या तरतुदी त्यात करण्यात याव्यात. आम्ही काही उपाय सुचविले आहेत. शासनाकडे वा पालिकेकडे काही उपाय असल्यास त्यांनी जरूर आम्हाला सुचवावेत. ‘फनेल’चे नियम बंधनकारक आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु आम्हाला त्यातून सुटका हवी आहे, अशीही या रहिवाशांची मागणी आहे.

झोपु योजनांतून निर्माण झालेला टीडीआर अन्यत्र विकण्यास मुभा आहे तर मग आम्हा रनवे फनेलबाधित रहिवाशांना अशी सवलत का मिळू शकत नाही.

– विश्वजीत भिडे, प्रतिनिधी, ‘एअरपोर्ट रवने

 फनेल’बाधित रहिवासी संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2017 2:14 am

Web Title: buildings redevelopment possible after selling additional fsi
Next Stories
1 ग्राहक प्रबोधन : ‘ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय’
2 आझाद मैदानातून : इतिहास सांगे गर्जून..
3 तपासचक्र : लालसेचा बळी
Just Now!
X