राज्यात कायम स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना व प्रारूप विधेयकास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यात स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२० रोजी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत विद्यापीठांचे माजी कुलगुरू, नामांकित महाविद्यालयांचे प्राचार्य यांचा समावेश होता. सार्वजनिक कौशल्य विद्यापीठ तसेच खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या या समितीचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला आहे. विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिनियम, मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन राज्यात स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावरील खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याकरिता तसेच त्यांच्या कामकाजाचे विनियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे प्रारूप तसेच विधेयकाचे प्रारूप तयार करण्यात आले.  कौशल्य विद्यापीठांद्वारे कौशल्य क्षेत्रातील पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण तसेच रोजगार व स्वयंरोजगार क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन कौशल्य अभ्यासक्रमावर आधारित पदविका व पदवी प्रदान करण्यात येईल.