News Flash

अंतिम वर्ष वगळता विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द

उर्वरित विद्यार्थ्यांचे पूर्वकामगिरीनुसार मूल्यांकन

(संग्रहित छायाचित्र)

 

राज्यातील विद्यापीठीय परीक्षांचे अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्र वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येतील, तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या पूर्वकामगिरीनुसार मूल्यांकन करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वेळापत्रकाबाबत शासनाने कुलगुरू आणि अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या शिफारसी राज्यातील समितीनेही कायम ठेवल्या आहेत. या समितीच्या शिफारसीननुसार अकृषी विद्यापीठांमधील फक्त अंतिम वर्षांच्या किंवा सत्र पद्धत असल्यास अंतिम सत्राच्याच परीक्षा होणार आहेत. इतर सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षा न होणाऱ्या वर्षांतील विद्यार्थ्यांची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. त्यांना पुढील चार महिन्यांत परीक्षेची संधी देण्यात येणार असून, परीक्षेमध्ये राहिलेल्या सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल.

विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन जुलैमध्ये करून १५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र गरज भासल्यास २० जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निर्णयात बदल करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

सामाईक प्रवेश परीक्षा जुलै अखेरीस

राज्यातील तंत्रशिक्षण, विधि, शिक्षणशास्त्र यांसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रवेश नियमन प्राधिकरण घेते. या परीक्षा २३ ते ३१ जुलै दरम्यान घेण्याचे प्राधिकरणाच्या विचाराधीन असून त्याचे सविस्तर वेळापत्रक येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

सीबीएसईच्या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीत घेण्यात येतील, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शुक्रवारी जाहीर केले.  सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या मिळून जवळपास ४९ विषयांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत. वाढलेली टाळेबंदी, परीक्षांसाठी लागणारा कालावधी आणि पुढील वर्षांचे वेळापत्रक यांचा विचार करून मंडळाने फक्त महत्वाच्याच विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या  २९ विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:26 am

Web Title: cancel other examinations of universities except final year abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एक लाख ऊसतोड मजुरांचे सुरक्षित स्थलांतर
2 पोलिसांनी पिटाळल्याने हजारोंची माघार
3 खडसे, पंकजा, तावडे, बावनकुळे यांची निराशाच
Just Now!
X