बॉलीवूड शहेनशहा अमिताभ यांच्या जुहू येथील बंगल्याच्या जवळच काल रात्री एक मोठा अपघात झाला. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू सर्कलच्या दिशेने जात असलेली पोर्शे गाडी रस्ता दुभाजकाला आदळून जवळपास वीस फूट लांब फेकली गेली. या दरम्यान दुभाजकाला लागून असलेला विजेचा खांबही पडला.  अपघात झालेल्या गाडीत दोन-तीनजण असल्याचे सांगितले जात होते. पण पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी गाडीत कोणीच आढळून आले नाही. या अपघातातील विशेष बाब म्हणजे काही वेळानंतर प्रसारमाध्यमे घटनास्थळी पोहोचली त्यावेळेस गाडीच्या दोन्ही बाजूंच्या नंबर प्लेट्स काढलेल्या होत्या. अपघाताच्या दोन तासानंतरही सविस्तर माहिती न मिळाल्यामुळे पोलिसांनी याबाबत बोलणे टाळले.