मध्य रेल्वेवरील दादर, माटुंगासह भायखळा, कल्याण, अंबरनाथ स्थानकांचा समावेश

रेल्वे स्थानकातील सेवांचा लाभ घेताना प्रवाशांनी जास्तीत जास्त रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारावर भर द्यावा, या उद्देशाने मध्य रेल्वेवरील आणखी पाच स्थानकांवर रोकडरहित सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दादर, माटुंगासह भायखळा, कल्याण, अंबरनाथ स्थानकांचा समावेश आहे. तिकीट खिडक्यांवर, रेल्वे हद्दीतील वाहन पार्किंग सुविधा, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्स, विश्रामकक्षांसाठी शुल्क देण्यासाठी पीओएस यंत्र, पेटीएम, स्कॅन कोड इत्यादी सुविधा येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्यात उपलब्ध केल्या जातील. या सुविधा निर्माण करतानाच रोख रकमेचा पर्यायही प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय लागू करण्यात आला होता. यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. हा निर्णय लागू केल्यानंतर सुरुवातीला रेल्वेच्या तिकीट व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नियमित केले जाणारे व्यवहार रोख रकमेऐवजी जास्तीत जास्त प्रमाणात रोकडविरहित असावेत, यावर केंद्र सरकारने भर दिला आणि त्याची पहिली सुरुवात रेल्वेतून करण्यात आली. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तिकीट खिडक्यांवरील व्यवहार रोकडरहित करण्यासाठी पीओएस (पॉइंट ऑन सेल) यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये केली.

पीओएस यंत्रावर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून तिकिटाचे शुल्क भरता येते. अशी यंत्रे सर्व स्थानकांत उपलब्ध केल्यानंतर मध्य रेल्वेने काही स्थानकांत सर्व सुविधांसाठी रोख रकमेचा व्यवहार सुरू ठेवतानाच संपूर्ण रोकडरहित व्यवहाराचा पर्यायही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे स्थानकात काही महिन्यांपूर्वी ही सुविधा उपलब्ध केली. यात तिकीट खिडक्यांवर, रेल्वे हद्दीतील वाहन पार्किंग सुविधा, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्स, विश्रामकक्षांसाठी शुल्क देण्यासाठी पीओएस यंत्र, पेटीएम, स्कॅन कोड इत्यादी सुविधा देण्यात आली.

रोख रकमेचा पर्यायही खुला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या तीन स्थानकांनंतर आता आणखी पाच स्थानकांत रोकडरहित सुविधा सुरू केली जाणार आहे. भायखळा, दादर, माटुंगा स्थानकांबरोबरच कल्याण आणि अंबरनाथ यात स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. पाच स्थानकांमध्ये सहा महिन्यांत रोकडरहित सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रवाशांसाठी हा एक पर्याय आहे. प्रवाशांना याचा उपयोग करता येत नसेल तर रोख रकमेचा पर्यायही खुला आहे, असेही त्यांनी सांगितले.