केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष पथकाने शुक्रवारपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु केला आहे. या पथकामने साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक आणि वैद्यकीय तपशील ताब्यात घेतले. सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. यापैकी एका तुकडीने सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या घरी उपस्थित असलेल्या नीरज सिंह याच्याकडे सीबीआयच्या पथकाने सुमारे तीन तास चौकशी केली. या चौकशीमध्ये मुख्य साक्षीदार असणाऱ्या नीरजला सीबीआय़ने काय प्रश्न विचारले यासंदर्भातील वृत्त ‘दैनिक भास्कर’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

नीरजला विचारण्यात आलेले प्रश्न :

१) अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर तुझं नात कसं होतं? किती दिवसांपासून तू इथे काम करत आहेस?

२) १३ जूनच्या रात्री घरी पार्टी झाली होती का? तसेच १४ जून रोजी सकाळी घरातील वातावरण कसं होतं?

३) सुशांतचा मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा त्याच्या रुममध्ये कोण होतं आणि घरात एकूण किती माणसं होती?

४) १४ जूनच्या सकाळी काय काय झालं हे सविस्तरपणे सांग. सुशांतला त्या दिवशी तू किती वेळा भेटलास?

५) सुशांत नेहमी स्वत:च्या रुममध्ये असायचा की तो घरातील लोकांबरोबर आणि रियाबरोबर वेळ घालवायचा?

६) १३ आणि १४ जून रोजी सुशांत नेहमीप्रमाणे जेवला होता का? त्याने काय काय खाल्लं होतं?

७) सुशांत आणि रियामधील नातं कसं होतं? लॉकडाउन संपल्यानंतर घरातून निघून जाण्यासंदर्भात काही सांगितलं होतं का?

८) सुशांतचा मृतदेह सर्वात आधी कोणी पाहिला?, सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले तेव्हा तू त्याच्या रुममध्ये होता का?

९) सुशांतचा मृतदेह खाली उतरवण्यास कोणी सांगितलं? मृतदेह खाली उतरवण्यासाठी तू मदत केली का? मृतदेह खाली उतरवताना किती लोकांनी मदत लागली?

१०) पोलीस कंट्रोल रुममला कधी आणि कोणी कॉल केला? पोलीस येण्याआधी आणि त्यानंतर घरात काय काय घडलं?

रियानेच नीरजला कामावर ठेवलं होतं

नीरज सिंह सुशांतच्या घरी मागील आठ महिन्यांपासून स्वयंपाकी म्हणून काम करत होता. नीरजला रियानेच नोकरीवर ठेवलं होतं. बिहार आणि मुंबई पोलिसांनी नीरजची याआधीच चौकशी केली आहे. सुशांतने माझ्याकडे पाणी मागितलं आणि नंतर तो रुममध्ये निघून गेला असं नीरजने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

आणखी वाचा- सीबीआयचं पथक पोहोचलं सुशांत सिंहच्या घरी; पाहणी करतानाचे फोटो आले समोर

नीरज यापूर्वी म्हणाला होता

नीरजने या पूर्वीच अनेकदा खुलासा केला आहे की ८ जून रोजी रिया घर सोडून निघून गेली होती. सुशांतसाठी एकूण १२ लोकं काम करायचे. त्यापैकी काही जणांना त्याने कामावरुन काढून टाकलं होतं. ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा तो स्वत:च चालत रुममध्ये गेला होता. त्यानंतर दरवाजा वाजवण्यात आला असता आजून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अर्ध्या तासानंतर परत दरवाजा वाजवण्यात आला मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. सुशांतला फोनही करण्यात आला तो ही त्याने उचलला नाही. त्यानंतर त्याच्या बहिणीला कॉल करुन बोलवण्यात आल्याचं नीरजने सांगितलं होतं.

आणखी वाचा- सुशांतची हत्या झाली का? एम्समधील डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवालाची तपासणी; सीबीआय तपासाला वेग

वांद्रे पोलिसांकडून ताब्यात घेतल्या वस्तू

सुशांतचे तीन फोन आणि लॅपटॉप सीबीआयने आपल्या ताब्यात घेतला आहे. सीबीआयने वांद्रे पोलिसांकडून सुशांतची डायरी, त्याचा लॅपटॉप आणि तीन फोन ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा बेडवर टाकलेली बेडशीट आणि ज्या हिरव्या कापडाने त्याने गळफास लावल्याचे सांगितले गेले ते कापडही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.